Tuesday, September 15, 2009

झंझावात आशा भोसले

मा. दीनानाथांसारख्या प्रतिभासंपन्न पित्याकडलं लाभलेलं स्वरांचं अनमोल धन, विलक्षण जिद्दी मन घेऊन आशाताईंनी पार्श्‍वगायनाच्या प्रांतात पाऊल ठेवलं, त्याला आता जवळजवळ साठ वर्षे होत आली.
सहा दशकं उलटली तरी आपल्यासारख्या रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद त्यांच्या आवाजात कायम आहे. बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व, या वयाच्या सर्व टप्प्यांत आणि पहाटेपासून उत्तररात्रीपर्यंत, दैनंदिनीच्या कुठल्याही वळणावर "आशाताईं'च्या सुरांनी उभारीच दिलेली आहे."उठी श्रीरामा'सारख्या भूपाळीतून पहाट प्रसन्न केलीय, "पंढरीनाथा झडकरी आता' किंवा "येगं येगं विठाबाई'सारख्या लालित्यपूर्ण भक्तिगीतांनी, दुपारच्या शांत वातावरणात पोटात खड्डा निर्माण केलाय. "नाच रे मोरा'नं शाळकरी सवंगडी भेटल्याचा आनंद दिलाय. "केव्हातरी पहाटे' किंवा "ही वाट दूर जाते'सारखं भावगीत असो, "रेशमाच्या रेघांनी'सारखी लावणी असो, आशाताईंच्या वैविध्यपूर्ण मराठी गीतांनी तांबड्या मातीतल्या साध्या माणसांना, वर्षानुवर्षे जगण्याचं बळ दिलंय.भावगीतांचा टप्पा बदलला, स्वररचनेचे आकार बदलले, रुची बदलली, पण आशाताईंचा आवाज बदलत्या प्रत्येक वळणावर अनोखे रूप घेऊन आपल्यासमोर आलाय. "तरुण आहे रात्र अजुनी' असो, गुलामअलींची गझल असो, नाट्यगीताचा तुकडा असू दे किंवा "जानम समजा करो'ची सुरावट असो, अनेक शब्दकार, संगीतकारांना, त्यांच्या शब्दस्वरांना आपल्या सुरांनी, आशाताईंनी "ताजा ग्रंथ' दिलाय.आपल्या मरगळलेल्या, गांजलेल्या आयुष्याला उभारी देणारा सुरांचा हा झंझावात आहे. आपल्या साऱ्यांच्या दैनंदिनीत सहजतेनं एकरूप झालेला. वैयक्तिक संकट-अडचणी बाजूला ठेवून, प्रसन्नपणे रंगमंचावरून सामोरे येत आपलेही ताणतणाव क्षणात दूर करणारा, सुरांचा हा चैतन्यदायी सुरेल आविष्कार आहे.तब्बल पंचवीस वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शनच्या जमान्यात अरुण काकतकरांच्या सौजन्यानं मी आशाताईंची प्रथम छोट्या पडद्यासाठी प्रकट मुलाखत घेतली. ८५ सालचा सप्टेंबर महिना. शहर मुंबई. फोर्टमधला आशिष स्टुडिओ. साईबाबावाल्या पांडुरंग दीक्षितांचा मुलगा "आशिष' केसातून हात फिरवत, सतत फिरक्‍या घेणारा, एकदम गंभीर झालेला असतो. कारण कोणत्याही क्षणी आशाताई स्टुडिओत येण्याची शक्‍यता असते.व्हायोलीन्स लागलेली. बाबूजी म्हणजे सुधीर फडके स्टुडिओत पोचलेले. मुलाखतीत ऐकवायच्या गाण्याचं रेकॉर्डिंग-कम-चित्रण करण्यासाठी आशाताई येणार असतात. त्यांच्या तोंडची गाणी पडद्यावर ज्यांच्यावर चित्रित होतात, त्या "नायिका' आपण नेहमी पाहतो, पण ती गाणी गाणाऱ्या पडद्यामागच्या "गायिका' मात्र प्रथमच पडद्यावर दिसणार असतात. स्टुडिओचा दरवाजा लोटताच मोगऱ्यासारखा वास देणाऱ्या इन्सेसचा गंध दरवळतो. पाठोपाठ खळाळत हसत आशाताई, स्काय ब्ल्यू काठाची पांढरी साडी, त्याच रंगाचे रेडिमेड फूल डोक्‍यात खोचलेले, अशा आत शिरतात. "चला आशिष, लवकर रेकॉर्डिंग करू या. मला नंतर "मेहेबूब'मध्ये पोचायचंय. एवढ्यात आशाताईंना "बाबूजी' दिसतात. क्षणात त्या विनम्र होतात. "नमस्ते बाबूजी...' निम्म्या झुकत हात जोडून नमस्कार करतात. "गीत रामायणा'त तल्लीन झाल्यानंतर हलते तशी मान हलवत, बाबूजी उजव्या हाताची एक तर्जनी नाचवत, आशाताईंकडे बघत आम्हाला सांगतात... "जशास तसे'मध्ये आशा प्रथम माझ्याकडे गायली.' लगेच आशाताई त्यांचे शब्द खोडतात... "नाही बाबूजी...' "जाळ्यात गावलाय मासा...!' पुढचं पाऊल. दोघांचे डोळे जुन्या आठवणींनी लकाकतात. "जिवलगा कधी रे येशील तू' गाण्याचं टी.व्ही.साठीचं रेकॉर्डिंग संपतं. बाबूजींचे डोळे पाणावलेले. ""त्या परमेश्‍वराची कृपा आहे. काय बाई आहे ही! पंचावन्न मध्ये मी प्रथम हे गाणं रेकॉर्ड केले अगदी तसाच आवाज. जागान्‌ जागा तीच. कमाल आहे.'' बाबूजींना गदगदून येतं. बाबूजींच्या स्तुतीनं आशाताई संकोचतात. मान डावीकडे झुकवत, रुमाल मानेवर टिपत, काहीशा हसत, डोळ्यांतून साऱ्यांना "धन्यवाद' देत स्टुडिओबाहेर पडतात.इथून माझा त्यांच्याबरोबरचा गप्पाष्टकांचा प्रवास सुरू होतो. कधी प्रभुकुंज, पेडर रोड, कधी खारच्या हेमंतच्या फ्लॅटवर, कधी बर्मन साहेबांचा हॉल, कोल्हापूरचं मैदान, नाशिक वा नागपूरच्या हजारो रसिकांसमोर विस्तारलेलं स्टेज, बडोद्याच्या महाराजांचा दरबार, जिव्हाळ्याच्या बोरिवलीकरांसमोर वा नेहरू स्टेडियमच्या प्रांगणात किंवा ठाण्याच्या "इंद्रधनू'त किंवा अमेरिकेतल्या "सॅन होजे'च्या अधिवेशनात खचाखच भरलेल्या अनिवासी भारतीय मराठी संमेलनात. ऐन पंचाहत्तरीत मुसळधार पावसात पुण्यातल्या रमणबाग शाळेत भिजत, तेवीस गाणी म्हणण्याचा दुर्दम्य उत्साह. सतत इतक्‍या वर्षांत मी त्यांना खळाळत, उत्साहातच पाह्यलंय. चुकूनही दुर्मुखलेपण नाही.लाल, केशरी, हिरव्या काठांच्या सिल्क साड्या गाण्यागणिक बदलत, डोईवरचं फूल बदलत, कधी नवग्रहांची माळ ठसठशीतपणे गळ्याभोवती पेहनत, कधी पाचू, कधी पोवळं, माणकं, मोती, अशा माळा बदलत, कधी हिऱ्यांची कुडी तर पॅरिसचं मॉडर्न कानातलं लटकवत, मनगटावरचं हिऱ्यामोत्यांनी चकाकणारं ब्रेसलेट आकाशाच्या दिशेनं भिरकावत आशाताई, हातातल्या माईकवरून, पंचाहत्तरीच्या उंबरठ्यावरही, "ले गई ले गई... मुझको हुई ना खबर' देशोदेशीच्या रंगमंचावरून म्हणू लागतात, तेव्हा त्यांची नातवंडं शोभतील, अशा वयाची श्रोत्यांमधली जनरेशनही बेभान होते, डुलायला लागते."विचारल्यावीण हेतू कळावा, त्याचा माझा सूर जुळावा...' म्हणता म्हणता अचानक घेतलेली आशाताईंची "तान,' अचानक आलेल्या वळवाच्या सरीचा प्रसन्न आनंद देते. "का रे अबोला'मधील "आर्जव,' "आ आ आजा' मधला "खळाळ,' "मेरा नाम है शबनम' म्हणत गाता गाता केलेला नटखट "संवाद,' "मुहब्बत क्‍या कहीये' म्हणत "गझल'चा नेमका पकडलेला चालू "ट्रेंड,' "सोना रे सोना रे...'मधून येणारी "नयी निखार,' "दिल चीज क्‍या है...' ऐकताना लखनौचा सरंजामीशाही महाल डोळ्यांसमोर उभं करणं, "पान खाये सैयॉं'मध्ये आठवणारी नौटंकीवाली, "शूरा मी वंदीले' म्हणताना दीनानाथांना केलेलं वंदन, कधी एखाद्या गाण्यातला "खटका,' तर कधी गाता गाता हसणं. त्या गात असतानाची किती किती रूप अनुभवलीयत. त्या नुसत्या "गायिका' नाहीत, तर प्रत्येक "शो' हिट करणाऱ्या बेस्ट परफॉर्मरही आहेत.केसाचा बुचडा बांधत, तोंडाला कसलंसं तेल चोपडत, त्या त्यांच्या मुंबईतल्या पेडर रोडवरच्या "प्रभुकुंज'मधल्या फ्लॅटच्या खोलीतून बाहेर येतात आणि हॉलमध्ये समोर अचानक उभे ठाकलेले, आपण कुणी ओळखीचे दिसलो की भरभरून हसतात. "माणसांनी आपल्याकडे यावं' ही आपुलकी, अगत्य त्या हसण्यात पुरेपूर भरलेलं असतं. "आलेच हं' असं म्हणत, क्षणात आत पळतात. फटदिशी टिनोपॉल व्हाइट कॉटन साडी नेसून, एकदम ताज्या तवाण्या, प्रसन्न मुद्रेनं तुम्हाला सामोऱ्या येतात.मनात येईल ते मनःपूर्वक बोलून मोकळ्या होतात. राग आला तर साऱ्यांसमक्ष चिडतात, फटकारतात आणि स्वतःची छोटीशी जरी चूक लक्षात आली, तरी "इमेज'चा बाऊ न करता, फट्दिशी "माफ करा हं' म्हणत खळाळतात.इतक्‍या निकोप, निखळ, स्वच्छ असल्यानंच, गाण्यातही त्यांचं निकोप मन उतरते आणि मग ते गाणं मनाइतकंच उत्कट बनतं. घरात कुणाला बरं नाहीसं झालं, तर "पूजा' बोलतात. मंत्रोच्चार करवतात. उत्कट -हळुवारपणाबरोबरच, "परवशता पारा दैवी'सारखं आक्रमक गाणं म्हणणाऱ्या आशाताई वेळप्रसंगी कणखरही आहेत. सांसारिक टक्केटोणपे खाऊनही म्हणूनच त्या टिकून आहेत.गाणं असो वा खाणं, "जमत नाही म्हणजे काय?' हे आव्हान त्या कायम स्वीकारतात. "अशक्‍य' हा शब्द त्यांच्या कोशात नाही. बाबांसारखी नाट्यगीतं म्हणता यावीत म्हणून गणपतराव मोहित्यांकडून "ढब' जाणून घेतली. बाबूजींकडून "उच्चारण' घोटून घेतलं. हवं तिथेच व्हायब्रेशन देत, प्रत्येक शब्द, प्रत्येक भावना, वेगळ्या तऱ्हेनं कशी मांडावी हे बर्मनदांकडून शिकून घेतलं, "शब्द चावू नका, मोकळं गा' ही शब्दांवर लक्ष देण्याची शिकवण, सी. रामचंद्रांनी माहीत करून दिली. त्यामुळे "मलमली तारुण्य माझे' मस्त रंगलं. पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरावटी ऐकण्यासाठी सोप्या, पण म्हणायला "अवघड,' त्यासाठी मेहनत घेतलीय. एकच आवाज वेगवेगळ्या स्टाइलने कसा आणता येतो त्याचा आत्मविश्‍वास "दी ट्रेन'पासून सुरू झालेल्या छोट्या बर्मनदांच्या बरोबरच्या प्रवासात वाढला. ध्वनिमुद्रणासाठी ध्वनिक्षेपकासमोर गेल्यावर त्या भोवतीचं सारं विसरतात. राग, लोभ, अन्याय, दुःख सारं सारं विसरून त्या गाण्यातल्या भावनेशी एकरूप होतात. समरस होतात. कारण माईक हाच माझा परमेश्‍वर आणि गाणं हीच माझी पूजा, यावर त्यांची श्रद्धा आहे.आयुष्यातील चढ-उतारांना, जो क्षण जसा येईल त्याला सामोरं जाणं, हसत जाणे, हा त्यांचा आयुष्यातला पणच आहे. कारण, त्यांचं म्हणणे...माझा रस्ता मी निवडलाय. त्याकरिता कुणाला दोष देणं मला आवडत नाही. मी "स्पष्टवक्ती- फटकळ' असल्याने मला "राजकारणात' आणि राजकारण करण्यात रस नाही.दीदींना त्या मानतात. "चले है तीर नजर के इधर से भी...' हे त्यांच्याबरोबर प्रथम द्वंद्वगीत म्हटले. दीदींनी "आनंदघन' म्हणून संगीतकार या नात्यानं "रेशमाच्या रेघांनी' ही लावणी म्हणवून घेतली. दीदी शेजारी असल्यानं मी म्हटलेली सर्वांत सभ्य लावणी, असं त्या मिस्कीलपणे नोंदवितात. बाळच्या म्हणजे हृदयनाथच्या रचना म्हणताना सर्वांत ताण असतो. तो गाताना गाण्याचे भाव, स्वर, लय, ताल यांना अगदी तपशिलात जाऊन बारकाव्यासह सादर करतो. त्याचं गाणं गाताना भीती वाटते. कारण सुरांच्या बाबतीत त्याचं कडक लक्ष असतं. त्याचं "जिवलगा राहिले रे दूर घर माझे' हे सात मिनिटाचं गाणं मी एका दमात गायलीय. श्‍वास जातोय कायमचा, असं वाटलं.""नव्या मंडळींनी गाण्याचा भाव अर्थ समजून घ्यायला हवा. संगीतकाराने शब्द कुठे तोडले आहेत, हरकत घेताना आवाजाला कुठे आवळून घ्यायला पाहिजे, ते शिकायला हवं. नुसत्या चाली पाठ करून चालणार नाही,'' असे त्या सुचवतात.पंचाहत्तरीतही त्यांच्या गाण्याची लोकप्रियता टिकून असण्यामागे कारण त्या सांगतात, की जसा जमाना आला, तशी मी बदलत गेले. त्या त्या जमान्याच्या स्टाइलमध्ये अडकले असते, तर संपले असते. सतत सर्वोत्तमच द्यायचं हा ध्यास. त्यामुळे मी गाणं आजही एन्जॉय करते. सुरेश भट आशाताईंना उद्देशून म्हणत...तारुण्य तुझ्या हृदयाचे हे असेच बहरत राहोवार्धक्‍य तुझ्या जगण्याला हे असेच विसरत राहोतलवार तुझ्या गीतांची, बिजलीसम तळपत राहो।।
)

No comments:

Post a Comment