चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले.चंद्रकांत ढवळपुरीकर हे तमाशा क्षेत्रातील अनुभवी आणि बुजुर्ग नाव होते. वगसम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर या नावाने गेली पन्नास वर्षे तमाशा फड गाजविला. आपल्या करारी भारदस्त आवाजाने आणि दमदार अभिनयाने त्यांनी तमाशातल्या वगाला कलात्मक दर्जा मिळवून दिला. चंद्रकांत भाऊंनी साकारलेला "अब्जलखान' अजूनही यापुढे कितीतरी काळ तमाशा रसिकांच्या स्मरणात राहील, यात शंका नाही. वगात खलनायकाची भूमिका करावी ती चंद्रकांत ढवळपुरीकरांनीच. सत्तर ते नव्वद या दशकात एकीकडे विठाबाई, कांताबाई आणि रोशनबाई यांच्या लावणीच्या दिलखेच अदांवर आणि त्यांच्या नशिल्या जवानीवर उभा महाराष्ट्र घायाळ होत होता, अशा काळात चंद्रकांत ढवळपुरीकर या तमासगिराने आपल्या दमदार अभिनयाने तमाशाच्या प्रेषकाला वगाची गोडी लावली. पारंपरिक तमाशाला आधुनिक चेहरा देऊन त्यातील नाट्य अधिक प्रगल्भ केले.अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील ढवळपुरी या गावात १९३२ मध्ये या कलावंताचा जन्म झाला. १९५० ते २००० ही ५० वर्षे त्यांनी तमाशा कलेतून समाजप्रबोधन केले. सुरवातीला विष्णू बुवा बांगर यांच्या तमाशात ढवळपुरीकरांनी नाच्याची भूमिका करून आपल्या तमाशा सेवेची नांदी उभी केली. १९५० नंतर तुकाराम खेडकर यांच्याबरोबरीने काम करत ढवळपुरीकर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रसिद्ध झाले. पुढे १९६४ नंतर त्यांनी दत्ता महाडीक पुणेकर यांच्या साथीने तमाशा फड काढला आणि यानंतर मात्र हा बहुआयामी तमासगीर स्वतंत्रपणे आपला तमाशा फड घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकरंजनासाठी फिरत राहिला.तमाशात नाच्या, सोंगाड्या, अभिनय सम्राट, मॅनेजर व तमाशाचा मालक अशा कितीतरी जबाबदाऱ्या झेलत झेलत ढवळपुरीकर लोककलेचा पारंपरिक व कलात्मक बाज तसाच ठेवून तमाशाला प्रबोधनाच्या वाटेवर आणू पाहत होते. ढवळपुरीकरांचा तमाशा का पहायचा? तर तो त्यांच्या वगामुळे, असे आजही बोलले जाते. "संत तुकाराम', "भक्त पुंडलिक', "चित्ता फाडला जावळीचा', "महाराष्ट्र झुकत नाही' हे चंद्रकांत ढवळपुरीकरांचे खास गाजलेले वग होते. या वगांतील गणोजी शिर्के, चंद्रराव मोरे, मंबाजी, आबाजी पाटील या व्यक्तिरेखांतून त्यांनी तमाशाशौकिनांना अक्षरशः वेड लावले. त्यांचा "महाराष्ट्र झुकत नाही' हा वग तर इराण, जर्मनी आणि अमेरिकेतील लोककलांच्या अभ्यासकांचा अभ्यासविषय बनला. तमाशा क्षेत्रात प्रचंड प्रसिद्धी आणि मान-सन्मान लाभलेला हा हाडाचा कलावंत होता. त्यांना महाराष्ट्र सरकारने कला पुरस्कार देऊन गौरविलेच, पण मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणचे अनेक नावाजलेले पुरस्कारही त्यांना मिळाले. प्रवरानगर येथील प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या पद्मश्री विखे पाटील पुरस्कारानेही हा कलावंत सन्मानित झाला. असे मानसन्मान आणि पुरस्कार मिळूनही त्यांची नजर तमाशाच्या फडाबाहेर गेली नाही. नाटक, चित्रपटाच्या आमिषाला न भुलता ते लोकनाट्याला नवा बाज देण्यात रममाण झाले.चंद्रकांत ढवळपुरीकरांनी तमाशात दोन पिढ्या घडविल्या. विठाबाई, कांताबाईंचा ते आदर्श होतेच; पण लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुवीर खेडकर आणि किरण ढवळपुरीकर या तरुण तमासगीरांनीही भाऊंकडून तमाशा कलेचे धडे घेतले. तमाशाच्या अनेक देशी-परदेशी अभ्यासकांचे भाऊ केंद्र होते. तमाशाचे सारे रस्ते याच आधारवडावर येऊन थांबत. त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत संयत व संयमी होते. शुद्ध वाणी, वाणीतला स्पष्ट आणि ओजस्वी भाव भाऊंना भेटणाऱ्या प्रत्येकावर मोहिनी टाकायचा. व्यक्तिगत जीवनात अत्यंत प्रेमळ माणूस म्हणून त्यांची ख्याती होती; पण तमाशात मात्र भाऊंनी खलनायकी पात्रांना साकारले. या अर्थाने भाऊंच्या समोर निळू फुले यांचा आदर्श होता. तमाशाबद्दल बोलताना ते आवर्जून अण्णा भाऊ साठेंचा उल्लेख करत. अण्णा भाऊंना अपेक्षित असलेले लोकनाट्य अजूनही का साकारत नाही, ही त्यांची खंत होती.तमाशात रात्रीचा राजा दिवसा मात्र भिकारी असतो. महाराष्ट्रातल्या साऱ्याच लोककलांची ही शोकांतिका आहे. चंद्रकांत भाऊ याला अपवाद नव्हते. अत्यंत शिस्तबद्धपणे तमाशा चालवूनही तमाशाचा मालक कर्जाच्या खाईत ढकलला जातोच. याला कारण तमाशा कॅन्सरसारखी शिरलेली सावकारशाही आणि शासनाची उदासीनता आहे, असे ते सातत्याने सांगत.आजचा तमाशा बदलला, त्याचा ऑर्केस्ट्रा झाला. नाटक आणि चित्रपटाचे तो अतिरेकी अनुकरण करायला लागला, तमाशाच्या प्रेक्षक बदलला, त्यांची अभिरुची बदलली, कला म्हणून तमाशा किती उरला आणि व्यवसाय म्हणून तो नेमका कुठे चालला आहे, असे प्रश्न तमाशासमोर आहेतच, याशिवाय तमासगिरांचे दारिद्य्र, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न, त्यांच्या मुलांचे शिक्षण असे असंख्य प्रश्न तमाशा कलेसमोर उभे असताना तमाशा क्षेत्रातला चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्यासारखा मार्गदर्शक फड सोडून जावा, ही तमाशा कलेच्या दृष्टीने अत्यंत शोकात्म घटना आहे.जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतून माणसाचे जीवन आमूलाग्र बदलणार, हे वास्तव आहे. सांस्कृतिक क्षेत्रावर या आधुनिक व आर्थिक बदलांचा निश्चितपणे परिणाम होत आहे. आज जगभरातल्या लोककला संपुष्टात येऊ पाहत असताना तमाशाकडून पारंपरिक अपेक्षा करून चालणार नाही, हेही वास्तव आहे; पण महाराष्ट्रातील तमाशा ही लोककला कला म्हणून संपत चालली आणि व्यवसाय म्हणून अधिकाधिक शृंगारिक बनली, याची सामाजिक आणि सांस्कृतिक कारणमीमांसा करण्याची ही निश्चित वेळ आहे. एकीकडे लोकसाहित्य व लोककलांच्या अभ्यासात तमाशाचा समाजशास्त्रीय अभ्यास झाला नाही आणि जो झाला तो विद्यापीठांच्या एम.फिल. व पीएच.डी. या पदव्यांपर्यंत मर्यादित राहिला. दुसरीकडे शासनाने व सांस्कृतिक कलांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांनी तमाशा कलेचा विकास होईल, तमाशा कलावंतांना सामाजिक न्याय मिळेल, अशी धोरणात्मक अंमलबजावणी कधीच केली नाही आणि तिसरीकडे शिक्षण, व्यसन, दारिद्य्र आणि नैतिक शिस्तीच्या अभावी तमासगीर केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरत राहिला. तमाशातील जातिव्यवस्था पाहिली तर अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. ""महाराघरी गाणं, मांगाघरी वाजवणं आणि ब्राह्मणाघरी लिव्हनं'' हे म्हणणे तमाशाला तंतोतंत लागू पडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला ब्रोकन मॅन (पाठीचा कणा मोडलेला माणूस) तमाशा कलेत पावलोपावली दिसतो आहे. या ब्रोकन मॅनचा विचार झाला नाही तर दिवसागणिक लावण्यांचे शृंगारिक नाद सजतील, कला केंद्र उत्तररात्री फुलतील, डान्स बार पुन्हा उघडतील आणि चंद्रकांत ढवळपुरीकरांसारखे तमाशातले असंख्य कलावंत दारिद्य्र व लाचारीचे जिणे जगत जगत जगाचा निरोप घेतील, ही पुरोगामी महाराष्ट्राची सांस्कृतिक शोकांतिका आहे. जोपर्यंत महाराष्ट्रातला पाटील बाई नाचवणे हे प्रतिष्ठेचे मानत राहील, तोपर्यंत तमाशा ही कला केवळ शृंगाराचा अड्डाच राहील, हे वेगळे सांगायला नको. चंद्रकांत ढवळपुरीकर हा कलावंत या साऱ्या गोष्टींच्या विरोधी होता. "कला म्हणून तमाशाला जपा,' हा ढवळपुरीकरांनी नव्या तमाशा कलावंतांना दिलेला संदेश आज शासनाने, तमाशाच्या अभ्यासकांनी, कलावंतांनी, प्रेक्षकांनी आणि तमाशाचा विकास करू पाहणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतला, तर या "वगसम्राटा'ला खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
Sunday, October 25, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment