Thursday, January 27, 2022

सुकृत

Thursday, April 15, 2010

रिलॅक्‍सेशनसाठी काही टिप्स
संगणकावर काम करण्याची गरज आज प्रत्येकालाच आहे. आधुनिकतेशी संबंध जोडण्यासाठी दैनंदिन व्यवहारात त्याची आवश्‍यकता असते. मात्र, सततच्या संगणकाच्या वापरापासून होणारे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणेही आवश्‍यक आहे. संगणकाच्या मॉनिटरमधून विशिष्ट प्रकारचे किरण बाहेर पडत असतात, त्याकडे सतत पाहिल्याने डोळ्यांना त्रास होतो. मात्र कामाच्या ओघात संगणकाचे काम काही क्षण बाजूला ठेवण्याचे भान राहत नाही. त्याचा डोळ्यांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यासाठी, संगणकावर सलग काम करायचे असेल, तर दर पंधरा मिनिटांनी मॉनिटरवरून नजर हटविणे आवश्‍यक आहे. काही काळ डोळे बंद ठेवून डोळ्यांना आराम द्यावा. थंड पाण्याचा हलका शिडकावाही दिवसभराच्या ताणातून मुक्ती देऊ शकतो. मॉनिटरचा प्रकाशही डोळ्यांना कमीत कमी त्रास होईल, अशा रीतीने करून घेणे चांगले. फक्त संगणकावर काम करण्यासाठीचे खास चष्मेही मिळतात, त्यांचाही वापर करता येईल. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने अशा गोष्टी केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहून ताणमुक्तीला मदत होईल आणि रोजच्या कामातला उत्साहदेखील वाढेल.संगीत ऐका मस्तरिलॅक्‍स व्हायचं असेल तर संगीत ऐकण्यासारखा छान उपाय नाही. हे संगीत टीव्हीवर पाहण्यापेक्षा ते ऐकतऐकत काम करणं जास्त रिलॅक्‍स करतं. त्यामुळे तुमच्या घरच्या रेडिओवरची किंवा म्युझिक प्लेअरवरची धूळ झटका आणि या संगीत-उपचारांची मजा घ्या. संगीत मनावरचा ताण हलका करतंच; पण आपलं आवडतं गाणं, आवडतं वाद्यसंगीत ऐकलं, की काम करण्याचा उत्साह वाढतो. अर्थात संगीत ऐकताना काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. सकाळी, दुपारी आणि रात्री त्या त्या प्रहराचा मूड ओळखून तशा प्रकारचं संगीत ऐका. रात्री झोपण्यापूर्वी ढॅणढॅण संगीत ऐकलं, तर झोप उडून जाईल, त्यामुळे त्या वेळी शांतच संगीत ऐकलं पाहिजे आणि सकाळी आवरतानाच्या वेळी मस्त उडत्या चालीची गाणी ऐका, म्हणजे कामं भराभर उरकतील आणि उत्साह वाटेल. संगीत ऐकताना त्याचा आवाज फार मोठा ठेवू नका, ते ऐकताना एकाच प्रकारचं संगीत ऐकण्यापेक्षा त्यात वैविध्य आणा, म्हणजे कंटाळा येणार नाही. ऑफिसमध्ये काम करतानाही बारीक आवाजात संगीत ऐकलं, तरी काम करताना फ्रेश वाटेल. टीव्ही बघण्यापेक्षा संगीत ऐकणं केव्हाही चांगलंच.

Sunday, April 4, 2010

बांधिलकी मानणारी लावणीसम्राज्ञी
संजय शिंदे
यमुनाबाई वाईकर यांनी नव्वदी पार केली असली तरी कलेसाठी आजवर व्यतीत केलेल्या आयुष्याचा सारा पट लख्खपणे त्यांच्या डोळ्यापुढे आहे. शरीर थकले तरी आवाजातील ठसका कायम. त्यामुळेच आजही लावणीचा विषय निघाला की त्या भरभरुन बोलतात. त्यांना नुकताच निळू फुले सन्मान पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांची भेट घेतली, तेव्हाही याचा प्रत्यय आला. ""निळूभाऊंचे माझे स्नेहाचे नाते होते. वाईत आल्यावर ते आवर्जून मला भेटायला येत होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मला महत्त्वाचा वाटतो,'' अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या कोल्हाटी- डोंबारी समाजात जन्मलेल्या यमुनाबाईंना परिस्थितीमुळे तमाशाकडे वळावे लागले; मात्र, गरिबीशी झगडत त्यांनी मोठ्या जिद्दीने आपले कर्तृत्व घडविले. सौंदर्य, अदाकारी व सुरेल आवाजाच्या देणगीमुळे त्यांनी मराठी लावणीच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. बालघाटी, छक्कड, चौकाची लावणी असे प्रकार त्या सादर करीत. बैठकीच्या लावणीला त्यांनी मोठा लौकिक मिळवून दिला. चौकाची लावणी ही त्यांची खासीयत होती. "का हो डोळे घालता सख्या', "सोडा मनगट हात तुटेल' अशा त्यांच्या लावण्या आजही रसिकांच्या ओठावर आहेत. यमुनाबाईंनी आयुष्यभर लावणी जिवंत ठेवली. पोटासाठी त्यांनी हा व्यवसाय स्वीकारला असला तरी या क्षेत्रात त्यांनी मोठे नाव कमवूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात त्याचा अजिबात लवलेशही जाणवत नाही. त्यांचे आपुलकीने बोलणे व वागण्यातील कमालीचा साधेपणा जाणवल्याशिवाय राहत नाही. यमुनाबाईंच्या तमाशा व लावणी क्षेत्रातील दखल घेऊन राज्य सरकारने त्यांना लावणीसम्राज्ञी पुरस्काराने सन्मानित केले. 1994 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र गौरव पुरस्कार, अखिल भारतीय जागतिक परिषद पुरस्कार आदी विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या लावण्यांवर अभ्यास करून अमेरिकेतील एका विद्यार्थिनीने डॉक्‍टरेट मिळविली आहे. तसेच लावणीवर तयार झालेला ग्रंथ कॅलिफोर्निया विद्यापीठात अभ्यासासाठी ठेवण्यात आला आहे. हा त्यांच्या कलेला मिळालेला मानाचा मुजरा आहे. कलाकार म्हणून त्यांचे वेगळेपण आहेच. मात्र, सामाजिक बांधिलकी जपण्यातही त्या मागे नाहीत. वाईत कोल्हाटी समाजासाठी घरे बांधण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांची भटकंती थांबवली. त्याचप्रमाणे अखिल महाराष्ट्र कोल्हाटी समाज संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा घेऊन समाज व्यसनमुक्त होऊन शिक्षणाकडे वळावा, यासाठी मोठी धडपड केली. त्यांच्या या धडपडीला आता यश मिळू लागले आहे.महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने नुकत्याच मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्यांना मानपत्र व गौरववृत्ती देण्यात आली. वयाच्या नव्वदीतही या कार्यक्रमास त्या उपस्थित राहिल्या होत्या. आता दगदग सहन होत नाही, अशी भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवते. रसिकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दलची कृतज्ञता त्यांच्या डोळ्यातून ओसंडून वाहते.

Wednesday, March 17, 2010

माणुसकीची मिणमिणती पणती
फादर फ्रान्सिस दिब्रिटो

समाजजीवनाचे भ्रष्टीकरण होत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या शर्यतीत सारे उतरले आहेत. या स्पर्धेत माणुसकी आणि मूल्ये यांचा बळी पडत आहे. तरीही वाऱ्यावादळाशी आणि पाऊसपाण्याशी झुंज देत एखादी पणती मिणमिणत असते. तीच मानवतेची तारणहार ठरत असते.कोल्हापूरचा कार्यक्रम संपवून पुण्याला आलो. थोडा लवकर पोचलो. हिवाळ्याचे दिवस होते. अंधार रेंगाळत होता आणि गार वारे बोचत होते.बाहेर पडलो. "भाऊ, कुठे जायचे आहे?'' एकामागून एक रिक्षाचालक विचारत होते. "नारायण पेठ पोलिस चौकी,' असे सांगताच रागाचा कटाक्ष टाकून खांदे उडवत दुसऱ्या गिऱ्हाइकाकडे ते धावत होते.तिथे काही बायाबापड्या होत्या. लेकुरवाळ्या होत्या. त्यांच्या हातात वजनी पिशव्या होत्या. नाना-नानी होते; पण जवळचे भाडे घेण्यास कोणीच तयार नव्हते. आचार्य अत्रे यांनी नवयुग पाठमालेत पुणेरी टांगेवाल्यांविषयी लिहिलेली गोष्ट आठवली. त्यानंतर मुळामुठेतून कितीतरी पाणी वाहून गेले आहे. पुण्याचे स्वरूप पार बदलून गेले आहे. आर्थिक सुस्थिती आली आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात पुण्याने फार मोठा पल्ला गाठला आहे. स्वरूप बदलले; पण त्याबरोबर साऱ्याच सवयी बदलल्या असे नाही. इंग्रजीत एक म्हण आहे- ओल्ड हॅबिट्‌स डाय हार्ड!एक रिक्षा आली. रिक्षाचालकाला विनंती केली. "बसा भाऊ,'' तो प्रेमाने म्हणाला. त्याने मीटर सुरू केले आणि मगच विचारले, ""कुठं जायचं आहे?''"भाऊ, इथं इतके रिक्षावाले आहेत; पण कुणीच का येत नाही गावात?''"आहो, ही बोहनीची वेळ. रामप्रहरी तरी कुणाला काही सांगू नये. माशा मारत बसतील; पण जवळचं भाडं करणार नाहीत. त्यांना लांबची भाडी हवी आहेत. तीही मीटर न लावता. प्रसंगी दोन-अडीचशे रुपये मागतात. लोक अडलेले असतात हो. एकाच मार्गावरून जायचं असलं, तरी दोघातिघांना एकत्र कोंबून प्रत्येकाकडून पैसे उकळतात...'' तो बोलतच होता. जातीबरोबर माती खावी, असे म्हणतात. सारेच आपल्या व्यवसाय बंधूंना सांभाळून घेत असतात. त्या पार्श्‍वभूमीवर त्याचा परखडपणा पाहून मी भारावलो."बाबा आढाव माझे मित्र आहेत. त्यांना मी या अडवणुकीबद्दल सांगणार आहे.''"तो देवमाणूस आमच्यासाठी खूप झटतो; पण ते तरी काय करणार? प्रत्येकासोबत एखादा पोलिस देणार का?''"समोर ट्रॅफिक पोलिस आहेत. ते का प्रवाशांच्या मदतीला धावत नाहीत? मुंबईत दादरला किंवा विमानतळावर अशा नाठाळांना पोलिसांच्या दंडुक्‍यांचा प्रसाद मिळतो.'' मी.माझ्याकडे वळून पाहत तो म्हणाला, ""आहो, इथंच घोडं पेंड खातं. त्यांचं एकमेकांशी संगनमत असतं. काहीच करणार नाहीत पोलिस...''"आमचं पोट रिक्षावर अवलंबून आहे. मेहनत केली आणि सच्चाईनं वागलो, तर चार पैसे मिळतात. मोठमोठी दुकानं आहेत, मॉल आहेत. तिथं गिऱ्हाईक येतं. घासाघीस करतं. सौदा पटला नाही, तर निघून जातं. आमच्या धंद्याचं तसं नाही. रिक्षाची चाकं रस्त्याला लागली रे लागली, की आमची कमाई सुरू होते. आणि हे बघा साहेब, हे लोक अव्वाच्या सव्वा भाडं आकारतात. अडवणूक करून प्रवाशांना लुबाडतात; पण हा सारा पैसा घरी जातो का?'' तो बोलतच होता."कुठे जातो?'' मी विचारले."काय सांगू तुम्हाला? तुम्हीच समजून घ्या. घामाचाच पैसा आपल्या घरी येतो. हरामाच्या पैशाला वेगवेगळ्या सतरा वाटा फुटतात,'' तो तत्त्वज्ञान सांगत होता.दरम्यान, आम्ही "स्नेहसदन'च्या दारात पोचलो. रिक्षाचालक, पोस्टमन, बस कंडक्‍टर आदींच्याबाबत मला विशेष प्रेम वाटते. इतरांप्रमाणे त्यांच्याकडे "जादा' कमाईचे मार्ग नसतात. त्यांना बक्षिसी देण्यात आनंद वाटतो. मी त्याला भाड्यापेक्षा थोडे जास्त पैसे दिले. त्याने ते परत केले."दादा, नाव काय तुमचे? बोलण्याच्या ओघात विचारायचे राहून गेले.'' मी."अब्दुल्ला,'' तो."इतकं सुंदर मराठी बोलता तुम्ही?''"साहेब, मराठी माझी मायबोली आहे. पुण्यातच माय मराठीच्या अंगाखांद्यावर वाढलो...''"पोटाची खळगी भरण्यासाठी खूप खटपटी, लटपटी केल्या. शेवटी ही रिक्षा भेटली. गिऱ्हाईक माझं दैवत आहे. मी कोणालाही कधीही नाही म्हणत नाही. चार पैसे खिशात पडतात. संसाराचा गाडा हाकता येतो. प्रामाणिकपणे कष्ट केले, तर अल्लाह नाही ठेवत उपाशी.'' निघताना तो म्हणाला.त्याचा नितळ, पारदर्शी स्वभाव, गिऱ्हाइकाबद्दल वाटणारा जिव्हाळा आणि मायमराठीवरील प्रेम पाहून मी अचंबित झालो. मी त्याला न्याहारीसाठी येण्याचा आग्रह केला; पण हातची गिऱ्हाइके जातील, म्हणून त्यानं नम्रपणे नकार दिला. समाजजीवनाचे भ्रष्टीकरण होत आहे. झटपट पैसे कमावण्याच्या शर्यतीत सारे उतरले आहेत. या स्पर्धेत माणुसकी आणि मूल्ये यांचा बळी पडत आहे. तरीही वाऱ्यावादळाशी आणि पाऊसपाण्याशी झुंज देत एखादी पणती मिणमिणत असते. तीच मानवतेची तारणहार ठरत असते.

Monday, March 15, 2010

मनस्वी प्रतिभावंत

विनायक ऊर्फ विंदा करंदीकर हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही रुढ साच्यामध्ये ते बसणारे नव्हते.
याचे कारण कोणतीही चाकोरी आंधळेपणाने स्वीकारणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळेच ज्या काळामध्ये बा. सी. मढेर्कर यांच्या काव्यप्रतिभेचा आणि बुद्धिमत्तेचा दबदबा होता, त्याच काळात विकसित होत जाणाऱ्या विंदांनी आपल्या लेखनावर आणि शैलीवर कोणाचीही छाया पडू दिली नाही. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यावर माधव जूलियन यांचा प्रभाव होता; पण पुढे तोही ओळखू येणार नाही, अशी स्वतंत्र वाट विंदा करंदीकर यांनी निर्माण केली. स्वतंत्र प्रतिभा, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, अफाट व्यासंग, कुतूहल वाटणाऱ्या विषयांमध्ये अधिकाधिक खोलवर जाऊन त्यांचा घेतलेला शोध आणि लावलेला अन्वयार्थ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते मार्क्सवाद असा प्रवास करूनसुद्धा जपलेला मनाचा-विचाराचा मोकळेपणा ही त्यांची काही ठळक वैशिष्ट्ये होती. कोकणामध्ये जन्मलेल्या विंदांचे बालपण फारसे सुखाचे नव्हते. पण त्याचा त्यांनी बाऊ केला नाही किंवा भांडवलही केले नाही. प्राप्त परिस्थितीपुढे ते झुकले नाहीत आणि चांगले दिवस आल्यानंतरही त्यांचे जमिनीवरचे पाय सुटले नाहीत. एकंदरच विंदा आयुष्य घट्टपणाने जगले. सामाजिक बांधिलकी या शब्दाचा सतत जप न करतासुद्धा अशी बांधिलकी जपता येते, हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या स्वभावात एक रोखठोकपणा होता आणि कोकणी माणसाकडे असणारा फटकळपणाही होता. पण विंदांचे हे रूप फणसासारखे होते. विंदांचे मन अतिशय संवेदनशील होते. लहान मुलाचे भावविश्व जाणून घेण्याची त्यांची शक्ती अचाट होती. त्यामुळेच त्यांनी मुलांसाठी विपुल लेखन केले. त्यांच्या 'एटू लोकांचा देश'ने तर पिढ्यानुपिढ्यांचे रंजन केले. विस्मयकारक कल्पना, हळुवार मनामध्ये अलगदपणाने प्रवेश करण्याची किमया, साधे-सरळ शब्द आणि प्रसन्न शैली यामुळे त्यांनी बालवाचकांसाठी एक आगळे दालनच खुले करून दिले. असे दालन की ज्यामध्ये ऋजुता जपलेल्या कोणत्याही वयाच्या वाचकाने सहजपणे शिरून आनंदित होऊन जावे. अशी किमया करणाऱ्या विंदांनीच सामाजिक वास्तव मांडणाऱ्या कविताही लिहिल्या. व्यक्तिगत भावजीवनाचेही चित्रण केले आणि जीवनातील अटळ सत्यही सांगून टाकले. या लेखनाने त्यांना उदंड प्रसिद्धी मिळाली. विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमांनी साऱ्या महाराष्ट्राला वेड लावले. पण विंदांची प्रतिभा कवितेतच अडकून पडली नाही. त्यांच्या लेखणीने लघुनिबंधही लिहिले. या निबंधांमध्येही विदांची विचारशक्ती किती वेगळ्या प्रकारे काम करत होती, याचेच दर्शन होते. 'पहिला पाऊस' या निबंधामध्ये साचेबद्ध चित्रण नाही. ते म्हणतात, 'पावसाविषयी मी विचार करू लागलो की मला न कळताच एका अज्ञात भूतकालाकडून माझे मन पछाडले जाते. पृथ्वीवर पडलेला तो पहिला पाऊस मला आठवतो; त्याचे लिंबाएवढे थेंब डोळ्यांसमोर गरगरू लागतात. लाव्हाच्या लाटांशी चालणारा त्याचा भयानक संघर्ष डोळ्यांसमोर तांडव करू लागतो. पृथ्वीवरचा तो पहिला पाऊस!' असे चकित व्हायला लावणारे, वेगळाच दृष्टिकोन मांडणारे, विचारांना नवीन दिशा देणारे, चाकोरीबाह्य विश्वाचा एक कोपरा उघडून दाखविणारे लेखन हाच विंदांचा विशेष होता. याच विशेषातून त्यांनी अॅरिस्टॉटलचे काव्यशास्त्र लिहिले, शेक्सपिअरच्या 'किंग लिअर'चे भाषांतर केले. हे करण्यामागे 'जगातील मौलिक ग्रंथ मराठीत आणून मराठी समृद्ध करणे आणि उच्च शिक्षणाचे माध्यम होण्याचे तिचे सार्मथ्य वाढवणे, ही कर्तव्यनिष्ठ प्रेरणा होती' असे विंदांनीच नमूद केले आहे. अशा अंगाने ग्रंथलेखन करणाऱ्या विंदांनीच तत्त्वज्ञानाच्या ओढीतून ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवचे अर्वाचिनीकरण केले. ते पूर्ण झाले, १९७८ सालामध्ये. त्याच्यापुढचेच वर्ष अल्बर्ट आइन्स्टाईनच्या जन्मशताब्दीचे वर्ष होते. जगाच्या विचारविश्वामध्ये घुसळण करून विज्ञानाला नवा आयाम प्राप्त करून देणाऱ्या या संशोधकाला विंदांनी आपला 'अमृतानुभव' ग्रंथ अर्पण केला. विज्ञानाबद्दलची अशी ओढ हासुद्धा विंदांचा विशेष होता. अशा ओढीतून त्या विषयाचे अभ्यासपूर्ण वाचन करणारे तत्त्वज्ञानाकडे अधिकच ओढले जातात. अलीकडे विंदाही चार्वाकपासून ते देकार्तपर्यंतच्या तत्त्वज्ञांकडे असेच वळले. हे तत्त्वज्ञ आणि त्यांचे विचार यांची ओळख करून देण्यासाठी त्यांनी 'अष्टदर्शने' लिहिली. याचा अर्थ वाढत्या वयाने त्यांच्या मनातील कुतूहलाला संपवले नव्हते आणि सरत जाणाऱ्या वर्षांनी त्यांच्या मनातील सजगता लोपली नव्हती. त्यामुळेच कबीर सन्मानापासून ते ज्ञानपीठापर्यंतच्या सन्मानांची रक्कम त्यांनी सामाजिक कार्यासाठी देऊन टाकली. 'देणाऱ्याने देत जावे। घेणाऱ्याने घेत जावे। घेता घेता एक दिवस। देणाऱ्याचे हात घ्यावेत।। असे सांगणाऱ्या विंदांनी आपल्या साहित्यातील शब्द कागदापुरतेच राहणारे नाहीत, हे सप्रमाण दाखवून दिले. त्यांच्या निधनाने प्रगल्भ प्रज्ञेचा उत्कट आणि मनस्वी प्रतिभावंत आपण गमावला आहे.
तत्त्वज्ञ कवी
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वप्ने उधळीत, गेलो झेपावत भविष्याच्या दिशेने घेऊन अगोदरच अटळाचे दर्शन, असे म्हणणारे विंदा आता दर्शनापार गेले आहेत. केशवसुत, माधव जूलियन, बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे या शृंखलेतील विंदा करंदीकर नावाची एक कडी अलगदपणे गळून पडली आणि या सामाजिक जाणिवेचा एक काव्यमय दुवा कायमचा हरपला. प्राध्यापक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर हे कवी म्हणून सर्वज्ञात असले तरीही इंग्रजीचे गाढे व्यासंगी प्राध्यापक, लघुनिबंधकार, साहित्यशास्त्राचे अभ्यासक, उत्तम भाषांतरकार आणि समीक्षक म्हणूनही खूप मोठे होते आणि त्याच्याही पलीकडे माणुसकीचे पूजक, तत्त्वज्ञ, स्वच्छंदी शैली जपणारे चिंतक म्हणूनही त्यांचे आगळेपण सांगता येईल. विंदांच्या जाण्यामुळे व्यवहारात चिक्कू म्हणून ओळखला जाणारा; पण वास्तवात आभाळाएवढा दानशूर असा माणूस आपल्यातून कायमचा गेला आहे. दैनंदिन जगण्यात पै-पैची बचत करणारा हा माणूस आपल्याला मिळालेली सारी संपत्ती सार्वजनिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांमध्ये आनंदाने वाटून टाकताना सतत दिसला आहे. एका बाजूला साहित्यनिर्मिती करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आगळेच म्हणावे लागेल. त्यामुळेच भागानगर सत्याग्रहात मिळालेली कारावासाची शिक्षा त्यांनी आनंदाने सोसली आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर सारे सन्मान त्यांचा पाठलाग करत असतानाही जाणीवपूर्वक वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची कृती त्यांनी करून दाखवली. अर्थात असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असले तरीही त्यांच्यातला कवी सर्वांत आघाडीवर होता, हेही खरेच. त्यांची मुख्य ओळख त्यामुळेच कवी अशीच राहील. "नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे; कोण मला वठणीला आणू शकतो तो मी पाहे' म्हणणाऱ्या केशवसुतांची, "मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे; नसो आज ऐश्‍वर्य आज या माउलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे' असे सांगणाऱ्या माधव जूलियनांची आणि "गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतिच काडी; म्हणायचा अन्‌ मनाशीच की या जागेवर बांधिन माडी' असे म्हणणाऱ्या बा. सी. मर्ढेकरांची परंपरा पुढे नेताना "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' असे म्हणणारे विंदा आज आपले दाते हात आणि माणसाच्या जगण्याचे लेखनातून आलेले निधान आपणा सर्वांसाठी मागे ठेवून आपल्यातून निघून गेले आहेत. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक म्हणून असलेली विंदांची ओळख अखिल भारतीय पातळीवर श्रेष्ठ साहित्यिक म्हणून असली तरीही त्यांच्यातला माणूस हा त्यांना मिळालेल्या साऱ्या पुरस्कारांपलीकडचा एक निखळ तत्त्वज्ञ होता. मात्र त्यांनी स्वतःकडे कधीही असे थोरपण असल्याचे मिरवले नाही. पण दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांसारख्या कवींनाही ते सतत आदर्श बनून राहिले होते, यातच त्यांचे मोठेपण स्पष्ट होते. त्यांच्या कवितेत माणसाच्या जगण्याचे भलेबुरे सारे पदर एकवटलेले होते. "अष्टदर्शने'सारख्या काव्यकृतीने त्यांनी जागतिक तत्त्वज्ञानाचे भांडार मराठी माणसाला खुले केले. तसेच त्याच माध्यमातून चार्वाकाचे अस्सल दर्शन घडवीत ज्ञानेश्‍वरांच्या अमृतानुभवाचेही आजचे विश्‍लेषण वाचकांसमोर ठेवले. चार्वाकाबद्दल आपल्या कवितेत ते म्हणतात, "चार्वाकप्रणित । सुखवाद काही, अयोग्य ते नाही । सुचवीत. सुखी होण्यासाठी। करावे काहीही, असे त्याने नाही। सांगितले. सुखासाठी चौर्य । वा मद्यप्राशन, चार्वाक-दर्शन । सुचवी ना.'' थोडक्‍यात सत्याचा स्वीकार आणि श्रद्धांचा अव्हेर तसेच हिंसेचा धिक्कार करून मानवी जीवन सुखमय करणे, हेच एक ध्येय मानणारे उद्योगप्रवण मानवतावादी असे चार्वाकाचे दर्शन ते घडवतात. आपल्या "अष्टदर्शने'त त्यांनी देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे, बर्गसॉं यांच्यासह चार्वाकाच्या तत्त्वज्ञानाची काव्यमय ओळख करून दिली. यातील चार्वाक वगळता, सारेच तत्त्वज्ञ प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण न मानणारे आहेत. मात्र चार्वाक हा प्रत्यक्ष हेच प्रमाण मानणारा. या सर्व तत्त्वविचारांची सांगड घालण्याचे काम त्यांनी या "अष्टदर्शने'च्या माध्यमातून का केले, असा प्रश्‍न समोर येऊ शकतो. परंतु शि. स. अंतरकरांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे विश्‍व आणि मानव यांच्या अस्तित्वाच्या स्वरूप आणि अर्थविषयक मूलभूत प्रश्‍नांचा शब्दप्रामाण्य न स्वीकारता केला जाणारा विचार म्हणजे तत्त्वज्ञान, हे समान सूत्र त्यामागे आहे. या साऱ्यातून कोणत्याही जगण्याच्या पातळीवर अंधानुकरणापेक्षा विचारगर्भ वृत्तीचा अंगीकार करण्याचे तत्त्व त्यांनी मांडले, हे लक्षात येते. म्हणूनच हा कवी केवळ काव्याच्या सौंदर्यासक्ततेचा भक्त न राहता, जीवनाच्या सौंदर्याचाही भाष्यकार ठरतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता जशी हेतुगर्भ होती, तशीच हेतुगर्भता विंदांकडे होती आणि तरीही निव्वळ हेतुगर्भ कवितेचे लेखन त्यांनी केलेले नाही, हेही महत्त्वाचे आहे. विंदांनी स्वेदगंगा, मृद्‌गंध, ध्रुपद, जातक आणि विरुपिका या क्रमाने आपले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वप्ने उधळीत, गेलो झेपावत भविष्याच्या दिशेने घेऊन अगोदरच अटळाचे दर्शन, असे म्हणणारे विंदा आता दर्शनापार गेले आहेत. काव्यसंग्रह प्रकाशात आणले. अनुभवाशी इमान राखणे आणि भाषेच्या रूढ वाटा टाळणे, ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये. सत्याचा शोध ही या सगळ्या कवितेमागची अंत:प्रेरणा असल्याचे दिसून येते. मात्र त्यामुळेच इंद्रियनिष्ठ अनुभवांनाही ते "प्रेम करावे शुद्ध पशुसम' अशा शब्दांनी सामोरे जाऊ शकले. हे करत असतानाच बालकविता, लघुनिबंध, समीक्षा हे प्रांतही त्यांनी ताकदीने हाताळले. "ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र', "फाऊस्ट', किंवा "राजा लिअर' सारखी त्यांची ग्रंथावरील टीकेसह केलेली भाषांतरे त्यांच्या व्युत्पन्नतेची साक्ष देतात. त्यांच्या भाषेतील अभिनिवेश, नाट्य आणि ठामपणा त्यांच्या लेखनाला सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धारही प्रदान करतो. हे वैशिष्ट्य खास करंदीकरांचेच आणि म्हणूनच त्यांच्या लेखनाचा आकृतिबंधही खास त्यांचाच. व्यक्तिगत आणि सामाजिक अनुभव आवश्‍यक तेव्हा अंतर्मुख पद्धतीने आणि जरूर तेव्हा बर्हिमुख स्वरूपात मांडण्याची त्यांची हातोटी, ही त्यांचे व्यक्तिमत्त्व एकारलेले नसल्याचेच दाखवून देते. स्वतःच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद करताना त्यांनी केलेले भाष्य हे ते स्वत:कडेही कसे अलिप्तपणे पाहू शकत होते, याचेच दर्शन घडवते. त्यांच्या बालकवितेत एक खट्याळ आजोबा दडलेले दिसतात. ही कविता साने गुरुजींसारखी भावुक आणि ध्येयवादी नाही. मात्र सहजसंवादी पद्धतीने मने जिंकत बालकांना आनंदाचे खजिने पुरवणारी आणि त्यातून नव्या विचारांची प्रेरणा देणारी म्हणून बघावी लागते. "अजबखाना', "एटू लोकांचा देश', "पिशीमावशी', "बागूलबोवा' सारखे त्यांचे संग्रह या दृष्टीने लक्षात घ्यावे लागतील. त्यांनी प्रेमकविता लिहिली तरी या प्रेमकवितेला रोमॅंटिसिझमचा वास नव्हता. किंबहुना स्त्रीबाबतची त्यांची करुणाच त्यांच्या कवितेतून जास्त ठळक झालेली दिसून येते. त्यांच्या कवितेत स्त्री आणि पुरुष यांच्यातील विरोध सातत्याने मांडला गेला आहे; मात्र त्यातला पुरुष स्त्रीपेक्षा नेहमीच खुजा आहे. स्वतः पुरुष असूनही हे वास्तव काव्यातून प्रकटणे हे त्यांची माणसाकडे पाहण्याची अलिप्ततावादी वृत्तीच दाखवते. "कर कर करा, मर मर मरा, दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा, तळा आणि जळा' असे म्हणत ते "भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत' या कवितेत स्त्रीच्या स्थितीवरती नेमकेपणाने बोट ठेवतात. बालकवितेतदेखील त्यांच्यातला तत्त्वज्ञ त्यांची पाठ सोडत नाही. "सून' ही त्यांची कविता त्या दृष्टीने बोलकी आहे. तीमध्ये ते म्हणतात, "एकदा कांद्याला म्हणाली लसूण, ""मला आण एक सून.'' मग कांदा बाजारात गेला, लवंग घेऊन घरी आला; लसूण म्हणाली "सून हुशार' लवंग झाली तिखट फार!'' जीवनातल्या वास्तवाची अशी पेरणी सहजगत्या करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. मंगेश पाडगावकरांनी "संहिता - विंदा करंदीकरांची निवडक कविता' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, "पूर आलेल्या नदीचा प्रवाह काठ जुमानीत नाही,' अगदी अशाच प्रकारचे रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जीवनाविषयीच्या जिवंत कुतूहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेत असत. कुठल्याही अनुभवावर किंवा काव्यप्रकारावर शुद्ध कलात्मक किंवा अ-कलात्मक असा शिक्का मारायला ते तयार नसतात. करंदीकरांची खरी बंडखोरी त्यांच्या या मनमोकळ्या, कलात्म प्रतिष्ठेचे साचे झुगारू शकणाऱ्या स्वीकारशीलतेत आहे. अनुभवाचे सामर्थ्य आणि कलात्मक रचनेचे सौंदर्य यांच्या एकजीवतेतून निर्माण होणारी जाणीव करंदीकरांच्या कवितेला व्यापून राहिलेली आहे. सतत जाणवणाऱ्या नवनव्या सत्याच्या संदर्भात करंदीकर जुन्या निष्ठा उलटसुलट करून तपासून पाहतात. स्वतःच कवटाळलेल्या विचारधारेशी विरोध पत्करतात. त्यामुळेच "वर्तमानपत्रांनी सकाळी घातलेला आगीचा रतीब पितो घटाघटा आणि प्रायश्‍चित्त म्हणून फिरवतो बोटे मुलांच्या जावळातून' असे ते म्हणू शकतात. सत्यदर्शनासाठी नीती-अनीतीच्या सांकेतिक कल्पनांचा त्याग ते करतात. सत्याचा शोध घेताना होणारे जीवनाच्या विसंगतीचे दर्शन ते सर्वांपर्यंत पोचवतात आणि तर्कापलीकडच्या सत्याची वाटणारी ओढ ते तितक्‍याच स्पष्टपणाने समोर ठेवतात. त्यामुळेच "पांथस्थ पक्षी', "निळा पक्षी', "तसेच घुमते शुभ्र कबुतर' सारख्या त्यांच्या कविता वेगळी प्रतीके घेऊन विचार करायला भाग पाडतात. इंद्रियनिष्ठ अनुभव आणि आध्यात्मिक अनुभव यांत भिंत उभी न करणे हे करंदीकरांचे एक वैशिष्ट्य आहे. ऐंद्रिय अनुभव नाकारणारे अध्यात्म आपण मानत नाही, असे म्हणणारे करंदीकर शारीर अनुभवाची उत्कटता आध्यात्मिकतेला भिडवून परस्परविरोधी तत्त्वांमधली साम्यस्थळे शोधण्याचेही काम करतात. माणसाचे जगणे हे एकारलेले असूच शकत नाही. एकाच वेळी परस्परविरोधी स्वरूपाच्या अनुभवांच्या समग्रतेतून त्याचा प्रवास चालू असतो, हे अतिशय स्वच्छ मनाने करंदीकर सांगू शकतात. कारण ते स्वतःही त्याच स्वच्छ मनाचे आणि निर्मळ आचाराचे उद्‌गाते म्हणूनच ओळखले जातात. "ये यंत्रा ये' म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारा हा कवी क्रांतीची चाहूल घेत "माझ्या मना बन दगड' असेही म्हणतो. वर्गसंघर्षाचे ढोल बडवतानाच नवसर्जनाचे न्यारे रूप ते आपल्यासमोर ठेवतात. कधी साम्यवादी वाटणारी त्यांची विचारधारा, व्यक्तिस्वातंत्र्याच्या गरजेपुढे बोथटपणा आला तरी हरकत नाही, असे म्हणताना दिसते आणि त्यामुळेच रिक्षाचे पैसे वाचवण्यासाठी चार किलोमीटर अंतर खांद्यावर फणसाचे ओझे घेऊन पार करणारा हा लेखक सार्वजनिक संस्थांना लाखो रुपयांची मदत अगदी सहजगत्या करताना दिसतो आणि देहदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही आपले तत्त्व टिकवून ठेवतो. या दोन्ही भूमिकांत लोकांना विरोधाभास दिसला, तरी प्रत्यक्षात तात्त्विक एकतानता आहे, हेच सिद्ध होते. हे सत्य ज्याला उमगले तोच विंदांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेईल.

Monday, March 8, 2010

"पुढारी' नको...!


"सकाळ'ने मध्यंतरी तबलानवाझ झाकीर हुसेन यांचा अत्यंत सुंदर कार्यक्रम घेतला. दुसऱ्यादिवशी कोल्हापुरातील एका सजग महिलेचा फोन आला, तो दोन कारणांसाठी. एक असे की इतका मोठा कलावंत "सकाळ' मुळे कोल्हापुरात आला, त्याबध्दल आभार आणि दुसरे असे की त्या कार्यक्रमात "सकाळ'ने एकाही राजकीय पुढाऱ्याला व्यासपीठावर येवू दिले नाही त्याबध्दल विशेष आभार. गेल्याच पंधरवड्यात देशातील सर्वात विश्वासार्ह व्यक्ती म्हणून ज्यांचा गौरव झाला ते माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुलकलाम यांचा कोल्हापूर दौरा झाला. त्या दौऱ्यातही केशवराव भोसले नाट्यगृहातील कार्यक्रमात त्यांनी "चांगला राजकीय नेता' व्हायला किती जणांना आवडेल असे विचारल्यावर कसाबसा एकाच मुलीचा हात वर गेला. सभागृहात चांगल्या शाळेतील उद्याचे भवितव्य म्हणता येतील अशी सातशे मुलं-मुली होती, त्यांतील फक्त एकाच मुलीस राजकीय नेता व्हावा, असे वाटावे, यातच राजकीय पुढारी या जमातीबध्दल समाजात किती खोलवर नाराजीची भावना आहे हे ध्यानात येवू शकेल.नगरसेवकांपासून आमदार-खासदारांपर्यंत बहुतेक राजकीय नेत्यांचे वागणे सारखेच असते, अशी समाजाची धारणाच बनली आहे. लोकांच्या घामातून उभ्या राहणाऱ्या संपत्तीवर हे लोक डल्ला मारतात आणि आपल्यासाठी कांहीच करत नाहीत असाही रोष वाढतो आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे आपल्या मुलाची संधी डावलली जाते असेही त्याला वाटते. दिलेला शब्द आणि वेळ कधीच न पाळणारा माणूस अशी राजकीय पुढाऱ्याची समानार्थी संज्ञा बनली आहे. आता राजकारणात येणारी पिढीही राजकीय पुढाऱ्यांच्याच घरांतील आहे. तिथेही सामान्य माणूस गावकुसाबाहेर. म्हणून राजकीय पुढारी होवून समाजसेवा करण्याचा विचार नव्या पिढीला खुणावत नाही. तेदेखील "करिअर' असू शकते असा तो विचारच करू शकत नाही. खरेतर आपल्या जगण्याशी संबंधित अनेक विषय ज्या व्यवस्थेशी संबंधित आहेत, त्या व्यवस्थेवर समाजाने दाखविलेला हा अविश्वास आहे.आपल्या देशाने राजकीय लोकशाही स्विकारली आहे. या लोकशाहीने सामान्य माणसाला अमुल्य असा मताचा अधिकार दिला आणि आपले राज्य कुणी करायचे हे ठरविण्याची ताकद दिली. परंतू ही ताकद अनेक कारणांनी दिवसेंदिवस क्षीण होत चालल्याचे चित्र दिसते. त्याचेच प्रतिबिंब व्यापक अर्थाने समाजमनांत उमटताना दिसते. त्यामुळेच राजकीय पुढारी व्हायला कुणाचे हात वर यायला तयार नाहीत, त्याचप्रमाणे विश्वासार्ह व्यक्ती म्हणून समाज त्यांना मान्यता द्यायला तयार नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी श्रध्दा बाळगणारा आपला समाज आहे. त्या श्रध्देला तडे गेल्यानेच लोकांची राजकारणाबध्दल नकारात्मक मानसिकता तयार होत आहे.त्यामुळेच सोनिया गांधीपेक्षा लोकांना डॉ.कलाम हे अधिक विश्वासार्ह वाटतात. कुठेही गेलो तरी लोकांना "पुढारी तेवढे नकोत.. अशी सार्वत्रिक चीड दिसते ती राजकीय नेतृत्वाला आत्मचिंतन करायला लावणारी आहे. - विश्वास पाटील