तत्त्वज्ञ कवी
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वप्ने उधळीत, गेलो झेपावत भविष्याच्या दिशेने घेऊन अगोदरच अटळाचे दर्शन, असे म्हणणारे विंदा आता दर्शनापार गेले आहेत. केशवसुत, माधव जूलियन, बा. सी. मर्ढेकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे या शृंखलेतील विंदा करंदीकर नावाची एक कडी अलगदपणे गळून पडली आणि या सामाजिक जाणिवेचा एक काव्यमय दुवा कायमचा हरपला. प्राध्यापक गोविंद विनायक तथा विंदा करंदीकर हे कवी म्हणून सर्वज्ञात असले तरीही इंग्रजीचे गाढे व्यासंगी प्राध्यापक, लघुनिबंधकार, साहित्यशास्त्राचे अभ्यासक, उत्तम भाषांतरकार आणि समीक्षक म्हणूनही खूप मोठे होते आणि त्याच्याही पलीकडे माणुसकीचे पूजक, तत्त्वज्ञ, स्वच्छंदी शैली जपणारे चिंतक म्हणूनही त्यांचे आगळेपण सांगता येईल. विंदांच्या जाण्यामुळे व्यवहारात चिक्कू म्हणून ओळखला जाणारा; पण वास्तवात आभाळाएवढा दानशूर असा माणूस आपल्यातून कायमचा गेला आहे. दैनंदिन जगण्यात पै-पैची बचत करणारा हा माणूस आपल्याला मिळालेली सारी संपत्ती सार्वजनिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांमध्ये आनंदाने वाटून टाकताना सतत दिसला आहे. एका बाजूला साहित्यनिर्मिती करत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आगळेच म्हणावे लागेल. त्यामुळेच भागानगर सत्याग्रहात मिळालेली कारावासाची शिक्षा त्यांनी आनंदाने सोसली आणि एका विशिष्ट टप्प्यानंतर सारे सन्मान त्यांचा पाठलाग करत असतानाही जाणीवपूर्वक वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची कृती त्यांनी करून दाखवली. अर्थात असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असले तरीही त्यांच्यातला कवी सर्वांत आघाडीवर होता, हेही खरेच. त्यांची मुख्य ओळख त्यामुळेच कवी अशीच राहील. "नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे; कोण मला वठणीला आणू शकतो तो मी पाहे' म्हणणाऱ्या केशवसुतांची, "मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ही राजभाषा नसे; नसो आज ऐश्वर्य आज या माउलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे' असे सांगणाऱ्या माधव जूलियनांची आणि "गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतिच काडी; म्हणायचा अन् मनाशीच की या जागेवर बांधिन माडी' असे म्हणणाऱ्या बा. सी. मर्ढेकरांची परंपरा पुढे नेताना "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे' असे म्हणणारे विंदा आज आपले दाते हात आणि माणसाच्या जगण्याचे लेखनातून आलेले निधान आपणा सर्वांसाठी मागे ठेवून आपल्यातून निघून गेले आहेत. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी साहित्यिक म्हणून असलेली विंदांची ओळख अखिल भारतीय पातळीवर श्रेष्ठ साहित्यिक म्हणून असली तरीही त्यांच्यातला माणूस हा त्यांना मिळालेल्या साऱ्या पुरस्कारांपलीकडचा एक निखळ तत्त्वज्ञ होता. मात्र त्यांनी स्वतःकडे कधीही असे थोरपण असल्याचे मिरवले नाही. पण दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांसारख्या कवींनाही ते सतत आदर्श बनून राहिले होते, यातच त्यांचे मोठेपण स्पष्ट होते. त्यांच्या कवितेत माणसाच्या जगण्याचे भलेबुरे सारे पदर एकवटलेले होते. "अष्टदर्शने'सारख्या काव्यकृतीने त्यांनी जागतिक तत्त्वज्ञानाचे भांडार मराठी माणसाला खुले केले. तसेच त्याच माध्यमातून चार्वाकाचे अस्सल दर्शन घडवीत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवाचेही आजचे विश्लेषण वाचकांसमोर ठेवले. चार्वाकाबद्दल आपल्या कवितेत ते म्हणतात, "चार्वाकप्रणित । सुखवाद काही, अयोग्य ते नाही । सुचवीत. सुखी होण्यासाठी। करावे काहीही, असे त्याने नाही। सांगितले. सुखासाठी चौर्य । वा मद्यप्राशन, चार्वाक-दर्शन । सुचवी ना.'' थोडक्यात सत्याचा स्वीकार आणि श्रद्धांचा अव्हेर तसेच हिंसेचा धिक्कार करून मानवी जीवन सुखमय करणे, हेच एक ध्येय मानणारे उद्योगप्रवण मानवतावादी असे चार्वाकाचे दर्शन ते घडवतात. आपल्या "अष्टदर्शने'त त्यांनी देकार्त, स्पिनोझा, काण्ट, हेगेल, शोपेनहौएर, नित्शे, बर्गसॉं यांच्यासह चार्वाकाच्या तत्त्वज्ञानाची काव्यमय ओळख करून दिली. यातील चार्वाक वगळता, सारेच तत्त्वज्ञ प्रत्यक्ष हे एकमेव प्रमाण न मानणारे आहेत. मात्र चार्वाक हा प्रत्यक्ष हेच प्रमाण मानणारा. या सर्व तत्त्वविचारांची सांगड घालण्याचे काम त्यांनी या "अष्टदर्शने'च्या माध्यमातून का केले, असा प्रश्न समोर येऊ शकतो. परंतु शि. स. अंतरकरांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे विश्व आणि मानव यांच्या अस्तित्वाच्या स्वरूप आणि अर्थविषयक मूलभूत प्रश्नांचा शब्दप्रामाण्य न स्वीकारता केला जाणारा विचार म्हणजे तत्त्वज्ञान, हे समान सूत्र त्यामागे आहे. या साऱ्यातून कोणत्याही जगण्याच्या पातळीवर अंधानुकरणापेक्षा विचारगर्भ वृत्तीचा अंगीकार करण्याचे तत्त्व त्यांनी मांडले, हे लक्षात येते. म्हणूनच हा कवी केवळ काव्याच्या सौंदर्यासक्ततेचा भक्त न राहता, जीवनाच्या सौंदर्याचाही भाष्यकार ठरतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता जशी हेतुगर्भ होती, तशीच हेतुगर्भता विंदांकडे होती आणि तरीही निव्वळ हेतुगर्भ कवितेचे लेखन त्यांनी केलेले नाही, हेही महत्त्वाचे आहे. विंदांनी स्वेदगंगा, मृद्गंध, ध्रुपद, जातक आणि विरुपिका या क्रमाने आपले रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वप्ने उधळीत, गेलो झेपावत भविष्याच्या दिशेने घेऊन अगोदरच अटळाचे दर्शन, असे म्हणणारे विंदा आता दर्शनापार गेले आहेत. काव्यसंग्रह प्रकाशात आणले. अनुभवाशी इमान राखणे आणि भाषेच्या रूढ वाटा टाळणे, ही त्यांच्या कवितेची खास वैशिष्ट्ये. सत्याचा शोध ही या सगळ्या कवितेमागची अंत:प्रेरणा असल्याचे दिसून येते. मात्र त्यामुळेच इंद्रियनिष्ठ अनुभवांनाही ते "प्रेम करावे शुद्ध पशुसम' अशा शब्दांनी सामोरे जाऊ शकले. हे करत असतानाच बालकविता, लघुनिबंध, समीक्षा हे प्रांतही त्यांनी ताकदीने हाताळले. "ऍरिस्टॉटलचे काव्यशास्त्र', "फाऊस्ट', किंवा "राजा लिअर' सारखी त्यांची ग्रंथावरील टीकेसह केलेली भाषांतरे त्यांच्या व्युत्पन्नतेची साक्ष देतात. त्यांच्या भाषेतील अभिनिवेश, नाट्य आणि ठामपणा त्यांच्या लेखनाला सौंदर्याबरोबरच एक काळीज कापणारी धारही प्रदान करतो. हे वैशिष्ट्य खास करंदीकरांचेच आणि म्हणूनच त्यांच्या लेखनाचा आकृतिबंधही खास त्यांचाच. व्यक्तिगत आणि सामाजिक अनुभव आवश्यक तेव्हा अंतर्मुख पद्धतीने आणि जरूर तेव्हा बर्हिमुख स्वरूपात मांडण्याची त्यांची हातोटी, ही त्यांचे व्यक्तिमत्त्व एकारलेले नसल्याचेच दाखवून देते. स्वतःच्या कवितांचे इंग्रजी अनुवाद करताना त्यांनी केलेले भाष्य हे ते स्वत:कडेही कसे अलिप्तपणे पाहू शकत होते, याचेच दर्शन घडवते. त्यांच्या बालकवितेत एक खट्याळ आजोबा दडलेले दिसतात. ही कविता साने गुरुजींसारखी भावुक आणि ध्येयवादी नाही. मात्र सहजसंवादी पद्धतीने मने जिंकत बालकांना आनंदाचे खजिने पुरवणारी आणि त्यातून नव्या विचारांची प्रेरणा देणारी म्हणून बघावी लागते. "अजबखाना', "एटू लोकांचा देश', "पिशीमावशी', "बागूलबोवा' सारखे त्यांचे संग्रह या दृष्टीने लक्षात घ्यावे लागतील. त्यांनी प्रेमकविता लिहिली तरी या प्रेमकवितेला रोमॅंटिसिझमचा वास नव्हता. किंबहुना स्त्रीबाबतची त्यांची करुणाच त्यांच्या कवितेतून जास्त ठळक झालेली दिसून येते. त्यांच्या कवितेत स्त्री आणि पुरुष यांच्यातील विरोध सातत्याने मांडला गेला आहे; मात्र त्यातला पुरुष स्त्रीपेक्षा नेहमीच खुजा आहे. स्वतः पुरुष असूनही हे वास्तव काव्यातून प्रकटणे हे त्यांची माणसाकडे पाहण्याची अलिप्ततावादी वृत्तीच दाखवते. "कर कर करा, मर मर मरा, दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा, तळा आणि जळा' असे म्हणत ते "भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत' या कवितेत स्त्रीच्या स्थितीवरती नेमकेपणाने बोट ठेवतात. बालकवितेतदेखील त्यांच्यातला तत्त्वज्ञ त्यांची पाठ सोडत नाही. "सून' ही त्यांची कविता त्या दृष्टीने बोलकी आहे. तीमध्ये ते म्हणतात, "एकदा कांद्याला म्हणाली लसूण, ""मला आण एक सून.'' मग कांदा बाजारात गेला, लवंग घेऊन घरी आला; लसूण म्हणाली "सून हुशार' लवंग झाली तिखट फार!'' जीवनातल्या वास्तवाची अशी पेरणी सहजगत्या करणे हे त्यांचे खास वैशिष्ट्य होते. मंगेश पाडगावकरांनी "संहिता - विंदा करंदीकरांची निवडक कविता' या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, "पूर आलेल्या नदीचा प्रवाह काठ जुमानीत नाही,' अगदी अशाच प्रकारचे रांगडे चैतन्य, जोमदारपणा हे करंदीकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. जीवनाविषयीच्या जिवंत कुतूहलातून करंदीकर काव्याची प्रेरणा घेत असत. कुठल्याही अनुभवावर किंवा काव्यप्रकारावर शुद्ध कलात्मक किंवा अ-कलात्मक असा शिक्का मारायला ते तयार नसतात. करंदीकरांची खरी बंडखोरी त्यांच्या या मनमोकळ्या, कलात्म प्रतिष्ठेचे साचे झुगारू शकणाऱ्या स्वीकारशीलतेत आहे. अनुभवाचे सामर्थ्य आणि कलात्मक रचनेचे सौंदर्य यांच्या एकजीवतेतून निर्माण होणारी जाणीव करंदीकरांच्या कवितेला व्यापून राहिलेली आहे. सतत जाणवणाऱ्या नवनव्या सत्याच्या संदर्भात करंदीकर जुन्या निष्ठा उलटसुलट करून तपासून पाहतात. स्वतःच कवटाळलेल्या विचारधारेशी विरोध पत्करतात. त्यामुळेच "वर्तमानपत्रांनी सकाळी घातलेला आगीचा रतीब पितो घटाघटा आणि प्रायश्चित्त म्हणून फिरवतो बोटे मुलांच्या जावळातून' असे ते म्हणू शकतात. सत्यदर्शनासाठी नीती-अनीतीच्या सांकेतिक कल्पनांचा त्याग ते करतात. सत्याचा शोध घेताना होणारे जीवनाच्या विसंगतीचे दर्शन ते सर्वांपर्यंत पोचवतात आणि तर्कापलीकडच्या सत्याची वाटणारी ओढ ते तितक्याच स्पष्टपणाने समोर ठेवतात. त्यामुळेच "पांथस्थ पक्षी', "निळा पक्षी', "तसेच घुमते शुभ्र कबुतर' सारख्या त्यांच्या कविता वेगळी प्रतीके घेऊन विचार करायला भाग पाडतात. इंद्रियनिष्ठ अनुभव आणि आध्यात्मिक अनुभव यांत भिंत उभी न करणे हे करंदीकरांचे एक वैशिष्ट्य आहे. ऐंद्रिय अनुभव नाकारणारे अध्यात्म आपण मानत नाही, असे म्हणणारे करंदीकर शारीर अनुभवाची उत्कटता आध्यात्मिकतेला भिडवून परस्परविरोधी तत्त्वांमधली साम्यस्थळे शोधण्याचेही काम करतात. माणसाचे जगणे हे एकारलेले असूच शकत नाही. एकाच वेळी परस्परविरोधी स्वरूपाच्या अनुभवांच्या समग्रतेतून त्याचा प्रवास चालू असतो, हे अतिशय स्वच्छ मनाने करंदीकर सांगू शकतात. कारण ते स्वतःही त्याच स्वच्छ मनाचे आणि निर्मळ आचाराचे उद्गाते म्हणूनच ओळखले जातात. "ये यंत्रा ये' म्हणत यंत्रयुगाचे स्वागत करणारा हा कवी क्रांतीची चाहूल घेत "माझ्या मना बन दगड' असेही म्हणतो. वर्गसंघर्षाचे ढोल बडवतानाच नवसर्जनाचे न्यारे रूप ते आपल्यासमोर ठेवतात. कधी साम्यवादी वाटणारी त्यांची विचारधारा, व्यक्तिस्वातंत्र्याच्या गरजेपुढे बोथटपणा आला तरी हरकत नाही, असे म्हणताना दिसते आणि त्यामुळेच रिक्षाचे पैसे वाचवण्यासाठी चार किलोमीटर अंतर खांद्यावर फणसाचे ओझे घेऊन पार करणारा हा लेखक सार्वजनिक संस्थांना लाखो रुपयांची मदत अगदी सहजगत्या करताना दिसतो आणि देहदानाच्या माध्यमातून मृत्यूनंतरही आपले तत्त्व टिकवून ठेवतो. या दोन्ही भूमिकांत लोकांना विरोधाभास दिसला, तरी प्रत्यक्षात तात्त्विक एकतानता आहे, हेच सिद्ध होते. हे सत्य ज्याला उमगले तोच विंदांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेईल.
Monday, March 15, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment