Sunday, November 1, 2009

लोकांचा लेखक

मराठी साहित्यविश्वातला छुपा चातुर्र्वण्य ज्यांना ठाऊक आहे, त्यांना बाबा कदम हा अस्सल कथा लिहिणारा लेखक मान्यते
च्या परिघाबाहेर कसा राहिला, याचे आश्चर्य वाटणार नाही. ते लोकप्रिय होते हा जणू त्यांचा गुन्हाच झाला. ते मुंबई-पुण्याच्या प्रस्थापित साहित्यिकांच्या कंपूत न वावरता दूर कोल्हापुरात राहून झपाटल्यासारखे लिखाण करत राहिले. रहस्यकथा, अपराध कथा, शिकार कथा, कोर्टरूम ड्रामा यांच्या अरण्यात रमले. साहित्यातले हे प्रांत तसे दुय्यम मानले जातात. तशात बाबांचे भरमसाठ लिहिणे म्हणजे श्रेष्ठतेच्या तथाकथित फूटपट्टीत उथळपणाचीच खूण मानली गेली. मानवी मनाचे विश्लेषण करण्याच्या फंदात न पडता ते माणसांच्या अर्तक्य वर्तनाचा, ते करण्यास भाग पाडणाऱ्या परिस्थितीचा, सामाजिक स्थितीचा वेध घेत राहिले. त्यांच्या लिखाणातला ग्रामीण ढंग, रांगडेपणा आणि बैजवार सांगण्याची तऱ्हा वाचकाला आवडली तरी साहित्यप्रांतातील टीकाकार आणि मान्यवर लेखक-प्रकाशकांना ती अदखलपात्र वाटली. पण एखाद्याने खरोखरच त्यांच्या कादंबऱ्यांचा नीट अभ्यास केला तर ज्यांना आपण मोठे लेखक मानले अशा कितीतरी लेखकांच्या लिखाणाहून त्यांचे लेखन मोठे होते, प्रत्ययकारक होते, याचा शोध लागेल. बाबा कदमांचे खरे नाव वीरसेन कदम. त्यांच्या थरारक कादंबऱ्या वाचतानाही हा कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा माणूस असणार असा वाचकाचा समज होई. प्रत्यक्षात मात्र बाबा उंचीने छोटे आणि मिष्किल होते. त्यांचे वडील कोल्हापूर संस्थानात अधिकारपदावर होते. त्यामुळे संस्थानी वातावरण, खानदानी रिवाज यांचा त्यांना चांगलाच परिचय होता. तरीही ते स्वत: रमले ते सामान्य माणसांच्या गोष्टींमध्ये. बी.ए., एलएल.बी. झाल्यावर त्यांनी फौजदारी वकील हा पेशा स्वीकारला. पुढे ते सरकारी वकील झाले. ३१ वषेर् त्यांनी पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून काम केले. हे करताना कौटुंबिक कलह, दुश्मनी, इस्टेटीची भांडणे, खून-मारामाऱ्या ह्यापोटी कज्जेदलालीच्या फेऱ्यात अडकलेल्या लोकांशी त्यांचा संपर्क येऊ लागला. मानवी स्वभावाचे अजबगजब नमुने त्यांना पाहायला मिळाले. त्यांना भेटणाऱ्या माणसांमध्ये आणि त्यांना अडकवणाऱ्या परिस्थितीमध्ये त्यांना कादंबऱ्यांची बिजे सापडू लागली. ही माणसे गावरान होती, रांगडी होती, भाबडी होती, निष्पाप होती, चालबाज आणि धोकादायकही होती. बाबांची दुसऱ्याशी संवाद साधण्याची हातोटी विलक्षण. त्यांनी या माणसांच्या कहाण्या जाणून घेतल्या. ती जिथे बोलत नसत त्या मधल्या नि:शब्द जागांमधले अर्थही बाबा ताडत असत. अशा सत्य घटनेवर आधारलेल्या सुमारे नव्वद कादंबऱ्या बाबा कदमांनी लिहिल्या. त्यांनी गुन्हा आणि गुन्हेगार यात फरक केला आणि गुन्हेगाराकडेही आत्मीयतेने पाहिले, ही त्यांच्या लेखकपणाची वेगळी खूण. ते शिकारीचे नादी. या नादापायी त्यांनी कोल्हापुरातली जंगले पालथी घातली. थरार केवळ कल्पनेने कागदावर उतरवला नाही तर स्वत: अंतर्बाह्य अनुभवला. डोंगरची मैना, भालू, जोतिबाचा नवस, अजिंक्य, बदला, ज्वालामुखी, सन्ना, इस्टेट मॅनेजर, पद्मजा अशी नावे असलेल्या त्यांच्या कादंबऱ्यांवर वाचकांच्या उड्या पडत असत. त्यांच्या एकेका कादंबरीच्या आठ आठ आवृत्त्या निघालेल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांनी असंख्य वाचनालये समृद्ध झालेली आहेत. परंतु एवढी प्रचंड लोकप्रियता लाभूनही बाबांना अहंकाराचा वारा लागला नाही. ते कायम ऋजु राहिले. औरंगाबाद येथे भरलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात बाबा कदमांची प्रकट मुलाखत ठेवण्यात आली होती. बाबांच्या गप्पीष्ट स्वभावाची प्रचीती यावेळी आली. त्यांची साहित्यविषयक धारणा, लेखकीय वेगळेपण आणि जीवनदृष्टी जाणून घेण्यासाठी सरसावून बसलेल्या मुलाखतकारांच्या प्रश्ानंना चक्क बाजूला ठेवून ते एका सत्यघटनेचे कथन असे काही रंगून जाऊन करू लागले की त्यांनी त्या दीड तासात एक अख्खी कादंबरीच उलगडली. त्यांना प्रश्ान् विचारणारे आणि मंडपात बसलेले श्रोते त्यांच्या रसाळ कथनात बघता बघता हरवून गेले. साहित्य संमेलन आणि बाबांचा एवढाच संबंध.

No comments:

Post a Comment