Sunday, January 24, 2010

घरोघरी नाहीत आता मातीच्या चुली!
पायाच्या दोन्ही अंगठ्यांत काठवट धरून भाकरी बडवायची. सुना उभ्या राहून परातीत भाकरी थापायला लागल्या. आईची टराटर फुगलेली भाकरी आणि सुनांचा पिठाचा भाजलेला लगदा. कशाची तुलना कशाशी करायची? आता घरात किचनकट्टा. शेगडी-लायटर. सगळं चकाचक. किचन कसं टीव्हीतल्या जाहिरातीगत दिसतं. ओव्हनपासून ते मायक्रोव्हेवपर्यंत सारं हाजीर! मिक्‍सरपासून ग्राइंडरपर्यंत सारं तैनात! फक्त चवीचा पत्ता नाही. कुठं हरवली ही चव? चुलीसमोर माझं बालपण गेलं. फुलती चूल... भुरभुरती चूल... भडकलेली चूल... थंड चूल... चुलीची अनेक रूपं पाहिली मी. माझ्या नकळत्या वयात. चूल आणि मूल. माझी आई या चुलीसोबत, माझ्यासोबत जगत होती. जगवत होती. चुलीसोबत पेटणं, धगधगणं, फुलणं, थंड होणं अनुभवलं मी माझ्या वयासोबत. आयुष्याशी जोडली गेली चूल, भानूशी आणि वैल. नाही कळत ना तुम्हाला? नकोच कळायला! काय असते चूल? तीन दगडांची चूल. कुणाचं पेटतं आयुष्य? कशी शोधली असेल माणसानं चूल? झाडावर झाड घासलं. उठली असेल ठिणगी. पेटला असेल वणवा. दावानल! जंगलभर, पोळले असतील पक्षी, प्राणी, पशू. माणसानं वाचवलं असेल आपल्याला. चलाखच तो. मेंदू होता त्याच्याजवळ. भाजलेला पशू-पक्षी-प्राणी-फळ-झाड चाखले असेल त्यानं. हे फारच ग्रेट! जीभ आणि चव. काही तरी वेगळं लागलं असेल माणसाला. मग विस्तवाचा शोध. यातायात. झाडावर झाड आपटा. दगडावर दगड. दिसली असेल ठिणगी. ती पकडा. ती साठवा. साठवता साठवता चुलीचा शोध. आधी फक्त मोकळी- धग. नंतर तीन दगडांची. मग कोणी तर कल्पक कुंभारानं बनवली असेल चूल. फारच बुद्धिमान असेल कुंभार. पेटणारी आग नियंत्रित करणारा. आगीला आकारात बंद करून इप्सिताजवळ पोचवणारा. त्यानंच बनवलं मडकं. मातीला आकार देऊन. पहिलं मडकं घडवणारा कुंभार नोबेल लॉरेटच! त्याला नाही दिलं कुणी नोबेल. बिचारा हाकलला गेला व्यवस्थेतून. ओबीसी हे आरक्षण देऊन! चूल : जणू काही घराची लक्ष्मीच!आई भल्या पहाटे उठून चुलीला पोतेरं द्यायची. हळद-कुंकू लावायची. चुलीत जिवंत ठेवलेला विस्तव फुलवत ठेवायची. शेणीवर. नव्हती तेव्हा काडेपेटी. विस्तव राखेत पेरून ठेवायचा. गरज असेल तेव्हा फुलवायचा. निर्माण करायची आग. जेव्हा चूल थंड पडायची तेव्हा आणायचा शेजाऱ्याच्या चुलीतून विस्तव. हक्कच तो! नव्हतं उसनं-पासनं. कैकदा असा विस्तव आणला आहे मी ही शेळकुंडावरून किंवा वडील आपल्या तंबाखूच्या पिशवीतून दोन गारगोट्या काढायचे. एकमेकांवर आपटून चकमक पेटवायचे. कप असायचा मध्ये. कप म्हणजे कापसाचं कवच. त्यावर फुलायचा विस्तव. पेटायची चूल. नंतर आली आगपेटी. गंधक सापडल्यावर. चुलीनं समृद्ध केलं आयुष्य. चुलीवरच्या गाडग्यातली आमटी. चुलीवरची भाकरी. चुलीवर तापवलेल्या दुधाची साय. वैलावर ठेवलेली भाजी. साऱ्यालाच मातीचा, राखेचा गंध. जिभेवर रेंगाळावी अशी चव. आईच्या हातातून चूल चव कमवायची. भाकरीला पापुद्रा यायचा. चूल लक्ष्मी घराची. आई भडकली, की चुलीशी बोलायची. चूल फुलली, तवा फुलला, की आई हेरायची... भांडण होणार. तव्यातली पहिली इटुकली भाकरी, आमटीचा पहिला थेंब, चहाचा पहिला घोट चुलीचा असायचा. चुलीला दिल्याशिवाय काहीच असायचं नाही आमच्या पदरात. चूल आणि आई दोघीही अन्नदात्या. दोघीत कमी-जास्त कोणीच नाही. जुना काळ आठवणं हा गुन्हाच!काळ बदलला. आई आणि चूल यांच्याबरोबर आम्ही वाढत गेलो. आईच्या घरात सुना आल्या. चूल, भानुशी, वैल, खोपडा, जळण, बाजूला सारलं जाऊन गॅस, शेगडी, लायटर आला. आई पायाच्या दोन्ही अंगठ्यांत काठवट धरून भाकरी बडवायची. सुना उभ्या राहून परातीत भाकरी थापायला लागल्या. आईची टराटर फुगलेली भाकरी आणि सुनांचा पिठाचा भाजलेला लगदा. कशाची तुलना कशाशी करायची? काठवट पायांच्या अंगठ्यात धरून आईची पाच-सहा बाळंतपणं सहज झाली. सुनांचं प्रत्येक वेळी सिझर. डॉक्‍टरांना जगवायला शेगडीचा जन्म.घरात किचनकट्टा. शेगडी-लायटर. सगळं चकाचक. किचन कसं टीव्हीतल्या जाहिरातीगत दिसतं. ओव्हनपासून ते मायक्रोव्हेवपर्यंत सारं हाजीर! मिक्‍सरपासून ग्राइंडरपर्यंत सारं तैनात! फक्त चवीचा पत्ता नाही. कुठं हरवली ही चव? हे फारच नॉस्टॅल्जिक झालंय ना? खरंय. आठवणं हा गुन्हाच. उलट येणाऱ्या काळावर स्वार होता आलं पाहिजे; पण कसं व्हायचं स्वार? वेगवेगळ्या जाहिरातींतल्या नवनव्या वस्तूंना घरात मोकाट प्रवेश देऊन? भरपूर लाकडं असायची शेतात. उन्हाळ्यात तोडायची, वाळवायची. पावसाळा निवांत. ददातच नसायची. झाड तोडायचा प्रश्‍न नसायचा. फक्त बेनायचं. पुन्हा झाड बेभान. जळाऊ लाकडंच लाकडं. भणभणती चूल. धुरात जीव घुटमळतो म्हणून आला वातीचा स्टोव्ह. मग रॉकेलचा प्रेशर स्टोव्ह. शेगडी ते गॅस. प्रगती हवीहवीच असणारी. मग प्रगतीचं शिखर मायक्रोव्हेव. अजून काहीही येईल. हवेतच शिजेल अन्न. चांगलंच आहे असं झालं तर! जगणं सुलभ, संपन्न होतच जायला हवं. प्रश्‍न इतकाच- शेतातली लाकडं, घरातली लाकडं, शिजवत जायचे लोक अन्न. तवा-चूल-भानुशी-वैल-राख साऱ्यांचंच रक्त जोडलं जायचं भाकरीशी. रॉकेल आलं. स्टोव्ह आला. बघता बघता गॅस आला. शेगडी आली. मायक्रोव्हेव आणि बाकी बरंच काही. प्रगती म्हणून भन्नाटच; पण कुठं? जिथं झाडं नाहीत, इंधन नाही तिथं सारं ठीक. त्यांनी गॅस पेटवावा. त्याची गरजच असते की; पण जिथं ही इंधनाची मुबलकता तिथं हा गॅस, ही शेगडी काय कामाची? कोणी म्हणेल वेळ वाचतो, श्रम वाचतात. अमूक होते-तमूक होतं. त्याचं काय? असेल बरोबर त्यांचं; पण उद्या संपेलच कधी तरी गॅस. रॉकेल आणि तुम्ही शोधलेले बरेच काही. विजेपासून अणूपर्यंत. तेव्हा पुन्हा माघारी वळण्यापेक्षा आत्ताच चूल जपायला काय हरकत आहे. आरोग्य तरी निरोगी राहील. चव शाबूत राहील. ऊर्जा टिकेल. गॅस खूप लोकांना पुरवून वापरता येईल. कोपऱ्यात पडलेली चूल यासाठी तरी शोधायला हवी. आपण कितीही मागास ठरलो तरी...!

No comments:

Post a Comment