Tuesday, February 16, 2010

दु:खाचा शोध घेतलाच पाहिजे!
झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते... उद्याच्या उड्डाणांचे आकाश पाहायचे असेल, तर नव्या पिढीने बदललेच पाहिजे. या बदलात सकारात्मकता हवी. बदलही विधायक हवेत. आपल्याला सुंदर जग हवे आहे ना; मग दुःखाचा शोध घेतला पाहिजे.काळ किती बदलतो बघा. परवा मी नागपुरात होतो. अर्थात, महत्त्वाच्या कामानिमित्तानेच गेलो होतो. अशोकवनात थांबलो होतो. सोबत गोपाळ फडणीसही होता. त्याचा भाऊ विवेक "व्हीसीए'चा सदस्य आहे. अनायसे भारत-दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट सामना सुरू होता. त्याने दोन तिकिटे दिली. आम्हाला थोडा वेळही होता. मंदाला खरेदीसाठी शहरात जायचे होते. मला त्या खरेदीत काही रस नव्हता. मी आणि गोपाळ सामना बघण्यासाठी जामठ्याच्या "व्हीसीए' स्टेडिअमवर गेलो. अगदी भोजनापर्यंतचा सामना बघून लगेच परतलोसुद्धा. "जंगलातून मैदानात' अशा फोटोओळींसह सामना बघतानाचे आमचे छायाचित्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले. फावला वेळ होता, म्हणून गेलो होतो. एरवी आमच्या वाट्याला असे वेळखाऊ मनोरंजन कधी आले नाही. एकतर हेमलकशात करमणुकीची साधने नव्हती. महाविद्यालयात असतानाही मी फारसा क्रिकेट वगैरे खेळलो नाही. कॉमेन्ट्री ऐकण्यापलीकडे माझे वेड पुढे गेले नाही. आमचा दुवाकॉलेज सुटले. मी इकडे आलो, तेव्हाही कॉमेन्ट्री ऐकणे कधीमधी सुरू होते. इकडे त्या काळात ना वृत्तपत्रे यायची, ना पुस्तके. जगाशी संबंधच नव्हता म्हणा ना! एकमेव ट्रान्झिस्टर होता. तो आमचा आणि जगातील दुवा होता. त्यावर आम्ही बातम्या ऐकायचो. स्थानिक स्टेशन्स खर्र-खर्र अशा आवाजासह ऐकावी लागायची. बीबीसी मात्र लागायचे. साधे आणीबाणीचेच उदाहरण घ्या. 26 जून 1975 ला लागू झालेली आणीबाणी आम्हाला कित्येक दिवस कळलीच नाही. प्रचंड पाऊस सुरू झाला असल्याने हेमलकशाचा उर्वरित भागाशी संबंध तुटला होता. मी बाप होणार होतो. मंदाची आबाळ नको म्हणून ताई तिला इथून घेऊन गेली होती. दिगंतच्या म्हणजेच पिलूच्या जन्माची बातमी नागपूरहून हेमलकशाला पोचायला महिना लागला. साक्षात बापालाच महिनाभरानंतर बातमी समजावी, असे तेव्हाचे अवघड दिवस होते. बाबांनी जगनला नेहमीप्रमाणे फोन केला होता. तो निघालाही; मात्र पावसाने सारे रस्ते अडवून ठेवले होते. तो तरी काय करणार?जन्मानंतर महिनाभरातच पिलूला डायरिया झाला. त्यामुळे जगन पुन्हा हेमलकशाला निघाला. माझ्या मुलाच्या जन्माची "बातमी' मला त्याच्या आजारपणामुळे महिनाभराने कळली. नाल्यानजीक जीप ठेवून जगन सायकलने हेमलकशात पोचला होता. निरोप कळल्यावर मी त्याच्यासह जीपशेजारी आलो. जीप दिसेचना. पाहतो तर नाल्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. नेमका मोठा दगड आडवा आल्याने ती अडकून पडली. मग आम्ही हिकमतीने दगड काढला. बंद पडलेली जीप कशी तरी सुरू केली. पाणी ओसरल्यानंतर आनंदवनसाठी रवाना झालो. आम्ही पोचलो तोवर रात्र झाली होती. आज ते सारे दिवस आठवले, तरी अंगावर शहारे येतात. काहीही सुविधा नसताना साऱ्या हालअपेष्टा कशा सोसल्या असतील, याचे आश्‍चर्यही वाटून जाते. एकमात्र खरे, या साऱ्यांमागे प्रेरणा होती, उद्दिष्ट होते- जगाला सुंदर करण्याचे. आज विश्‍वासाने वावरणारे आदिवासी दिसले की खूप बरे वाटते. जग बदलले. खेड्यापाड्यात टीव्ही पोहचला. परवा क्रिकेट सामना बघून आल्यानंतर या सर्व गोष्टी आठवायला लागल्या. काम हाच विरंगुळा !तेव्हा एक बरे होते. कामे एवढी असायची, की फावला वेळ उरायचाच नाही. पेशंट नसताना मी दाट जंगलात जायचो. जळाऊ लाकडे आणावी लागायची. मी ट्रॅक्‍टर चालवायचो. बांधकामासाठी दगड आणावे लागायचे. मी एकटाच जायचो असेही नाही. आम्ही सर्व जण मिळून सारी कामे करायचो. दिवसभर कोणत्या ना कोणत्या कामात आम्ही सर्व गुंतलेलो असायचो. कामांनी थकल्यामुळे रात्री झोप यायची. तसे बऱ्यापैकी वाचनही चालायचे. त्या काळात गाजलेली पुस्तके मी वाचून काढली होती. हे कार्य चालायचे कंदिलाच्या प्रकाशात. लाइट नव्हतेच ना! सुटीचा वेळ मिळालाच, तर मी जंगलात भटकून यायचो. अगदी दूरवर चालत जाऊन अनेक व्यक्तींना भेटणे हा माझा छंद होता. तेवढाच विरंगुळा. मंदाला बागकाम आवडायचे. ती फळझाडे, फुलझाडांमध्ये रमायची. आदिवासींकडे धड कपडे नव्हते. साध्या लंगोटीवर ते राहायचे. माडिया फारसे कपडे घालायचे नाहीत. कमरेला फडके बांधले, की झाला त्यांचा पोशाख. लहान मुलांच्या अंगावर लंगोटसुद्धा नसायचा. तेव्हा सरकारची एक "जनता योजना' सुरू होती. 20 रुपयांत वस्त्रोद्योग महामंडळात जनता साड्या मिळायच्या. शंभराची साडी फक्त वीस रुपयांत मिळायची. मंदा या साड्या आदिवासींपर्यंत पोचवायची. स्वस्त कापड मिळाल्याने त्यांनाही ते परवडायचे. अशी काही कामे आम्ही वाटून घेतली होती. खरे सांगायचे तर, "रिकामे मन सैतानाचे घर,' या उक्तीप्रमाणे आम्ही स्वतःला सतत व्यस्त ठेवायचो. माझ्यासह सर्व मित्रांनी सर्व प्रकारची कामे केली आहेत. अगदी संडाससुद्धा साफ केले आहेत. तेव्हाचे संडास म्हणजे, खड्डा खोदून माती टाकायची पद्धत होती. कामाची लाज आम्ही बाळगली नाही. श्रमांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचा संकल्प केल्यानंतर कष्टसुद्धा हलके होऊन जायचे. आदिवासी उघडेनागडे राहायचे; पण त्यांचा प्रामाणिकपणा आम्हाला भावला होता. ते कष्टाळूही होते. हाफपॅन्ट हाच पोशाख !कॉलेजमध्ये असतानाही मी साधा शर्ट-पॅन्ट घालायचो. इथे आल्यावर पायजमा शर्ट घालायला लागलो. कुडकुडणाऱ्या थंडीत उघड्या शरीराने हिंडणारे आदिवासी बघून आपल्याला पूर्ण कपडे घालायला मिळतात, याचीही लाज वाटायची. तेव्हापासून मी हाफपॅन्ट आणि अर्ध्या बाह्यांचा बनियन वापरायला सुरवात केली. हाच माझा पोशाख झाला. बाहेर जायचे असेल तेव्हा फक्त पायजमा सदरा घालायचो. एरवी माझा हाफपॅन्ट-बनियनचा पोशाख ठरलेला असायचा. अगदी आजपर्यंत ती सवय कायम आहे. सगळेच कार्यकर्ते असे कपडे घालायचे. गरज नसलेल्या गोष्टी टाळायच्या, हे ठरवून टाकले. एकेक गोष्टी आपोआपच सुटत गेल्या. केसांना तेल लावणे बंद केले. कंगव्याचीही गरज वाटेनाशी झाली. टायरच्या चपला अंगवळणी पडल्या. स्वतःची आणि अनेकांची कटिंग मी कित्येकदा करून दिली आहे. त्यात काही वेगळेही वाटायचे नाही. सारे काही सवयीवर अवलंबून असते. आजकालचे मोबाईलवेड बघितल्यावर तेव्हाच्या जगण्याचा अचंबा वाटतो. आता सेकंदा सेकंदाला बातमी येते. तेव्हा कित्येक महिने काही कळायचे नाही. एखादी गंभीर घटना घडली तरी आमच्यापर्यंत येईस्तोवर सर्व काही "सेटल' झालेले असायचे. काही बातमी आली नाही, म्हणजे सर्व काही व्यवस्थित आहे, असा आमचा समज होता. आता परिस्थिती बदललीय. ट्रान्झिस्टर गेले. घरोघरी मोबाईल आले आहेत. जंगल प्रदेशातही डिश ऍन्टेने पोचले. हेमलकशाजवळच्या सर्व खेड्यापाड्यांत क्रिकेट आले. जंगल तुटले. गावागावात मैदाने झाली आहेत. पोराटोरांच्या मॅचेस होतात. गर्दीही होते. काळानुसार बदल होणारच. मी तरी आजवर "कॉमेन्ट्री'पलीकडे कुठे पोचलो होतो? अगदी विदेशात जाऊन आलो असलो, तरी क्रिकेट सामना बघण्याचा योग मात्र प्रथमच जुळून आला. काळाने घेतलेली झेप ओघाओघाने आठवली. कोणताही बदल आत्मसात केला पाहिजे. "ज्वाला आणि फुले'मध्ये बाबा म्हणतात ते खरे आहे. झेपावणाऱ्या पंखांना क्षितिजे नसतात. त्यांना फक्त झेपेच्या कवेत येणारे आकाश असते... उद्याच्या उड्डाणांचे आकाश पाहायचे असेल, तर नव्या पिढीने बदललेच पाहिजे. या बदलात सकारात्मकता हवी. बदलही विधायक हवेत. आपल्याला सुंदर जग हवे आहे ना; मग दुःखाचा शोध घेतला पाहिजे. स्वतः कष्ट उपसले पाहिजेत. सर्व सुंदर बदलांच्या स्वागतासाठी अधीरही झाले पाहिजे.

Monday, February 8, 2010


लव्ह अॅट र्फस्ट साइट, प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नाही. प्रेम करून लग्न झालं नसेल तर, लग्नानंतर प्रेम करायला का
य हरकत आहे? अॅरेंज मॅरेज लव्ह मॅरेजमध्ये बदलणं शक्य आहे. भारतात रुजलेल्या या संस्कृतीवर आता अमेरिकन नागरिकांचाही विश्वास बसू लागलाय. ............. लग्न ठरवताना प्रत्येकाच्या बाबतीत 'लव्ह अॅट र्फस्ट साइट' असं घडेलच याची शक्यता नाही. अशा वेळी मग, पर्याय स्वीकारला जातो तो अॅरेंज मॅरेजचा. काही जणांची लव्हस्टोरी प्रेमापासून सुरू होते आणि त्याची परिणीती लग्नात होते. तर काही जणांचं लग्न आधी होतं आणि मग प्रेमाला बहर येतो. 'समव्हेअर समवन इज मेड फॉर यू' असं म्हणूनच म्हटलं जातं. पण, अशा वेळी प्रश्न पडतो तो म्हणजे 'असं ठरवून, समजून-उमजून प्रेम करता येतं?' याचं उत्तर अर्थातच 'हो' असं आहे. ठरवून लग्न करायंच. एकमेकांना समजून घेत संसाराचा गाडा हाकायचा, शक्य तेव्हा तडजोडी करायचा हा भारतीयांचा फण्डा. इन्स्टण्ट मॅरेज आणि झटपट घटस्फोटाचं लोण अलिकडेच परदेशातून आयात केलेलं. आपल्याकडे प्रेम शरीरापर्यंत मर्यादीत राहत नाही. आपला कल एकरुप होण्याकडे असतो. मन आणि आत्म्याशी याचा संबंध. कालपर्यंत बोजड वाटणारा हा विचार कुटुंबसंस्थेचे तीन तेरा वाजलेल्या अमेरिकेतही स्वीकारला जातोय. अमेरिकन सायकोलॉजिस्ट आणि लेखक रॉबर्ट एपस्टिन याच्या मते, एखाद्या व्यक्तीवर ठरवून प्रेम करता येतं आणि लवकरच हा पॅटर्न अमेरिकेत स्वीकारला जाईल, असं त्यांचं ठाम मत आहे. याचं कारण तिथे नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेले प्रचंड तणाव आणि त्यामुळे अर्ध्यातच तुटणारी नाती आहे. यावर तोगडा म्हणजे कोणावर प्रेम करायचं, त्या व्यक्तीची निवड करून आपण त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करू शकतो, असं मत रॉबर्ट मांडतो. रॉबर्टच्या पहिल्या लग्नाचा शेवट घटस्फोटात झाला. ही घटना खूपच वैयक्तिक स्वरूपाची असली, तरी याचा त्याच्यावर खूपच परिणाम झाला. नात्यात आलेल्या या अपयशामुळे तो खूपच फ्रस्ट्रेट झालो होता. त्यातून टिकाऊ संबंधाबाबत त्याच्या डोक्यात चक्र सुरू झालं. आज आपल्या आजूबाजूला पाहिलं, तर घटस्फोटांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येतंय. लव्ह मॅरेज असूनही नातं असं असफल होत असताना अॅरेंज मॅरेजची तर बातच सोडा. कारण यात दोन अनोळखी व्यक्ती दोन-चार वेळा भेटतात आणि मग, लग्नाचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्यात खरंच प्रेम किती असतं, हा खरा मुद्दा. लव्ह मॅरेजमध्ये ते दोघे जण एकमेकांना ओळखत असतात, एकमेकांवर प्रेम करत असतात. पण अॅरेंज मॅरेजमध्ये असं नसतं. ते दोघे फार तर चारसहा महिने एकमेकांना ओळखत असतात. पण, आपल्या मनाशी ठाम निश्चय केला, तर मात्र आपण समोरच्या व्यक्तीवर खरंच प्रेम करू शकतं, अगदी समजून-उमजून! आपण सगळेच परीकथा आणि रोमॅण्टिक सिनेमे पाहत आणि ऐकत लहानाचे मोठे होतो. या परीकथांप्रमाणे स्वप्नातला राजकुमार किंवा राजकुमारी आपल्याला भेटेल, अशी आपल्या सगळ्यांचीच कल्पना असते. या कल्पनेनुसार टीनएजपासून तारुण्यात प्रवेश करेपर्यंत आपण सगळेच आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आपला जोडीदार शोधत असतो. आणि त्यापैकी काहींना त्यांचा सोलमेट भेटतो, तर अनेकांना तो कांदेपोह्यांच्या मार्गाने शोधावा लागतो. पण, मार्ग कोणताही असला, तरी एखाद्या व्यक्तीवर ठरवून प्रेम करायचं म्हटलं, तर ते निश्चितच शक्य आहे, असं रॉबर्ट सांगतो. घटस्फोटानंतर बराच काळ फ्रस्ट्रेट असणाऱ्या रॉबर्टच्या आयुष्यात कामानिमित्त आलेल्या एका तरुणीबरोबर निर्माण झालेल्या अशा नात्याच्या आधारे आपण असं मत व्यक्त केल्याचं तो सांगतो. केवळ याच प्रयोगाच्या आधारे नाही तर अॅरेंज मॅरेजेसच्या केलेल्या अभ्यासाचाही आधार याला लाभला असल्याचं तो सांगतो. ठरवून लग्न केलेल्या जोडपं प्रथम लग्नसंस्कारांनी एकत्र येतं, तर कालांतराने निर्माण झालेलं प्रेम त्यांना एकमेकांशी बांधून ठेवतं. आजही आपल्याकडे ठरवून लग्न करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. अशा लग्नासाठी एकमेकांवर विश्वास हाच आधार असला, तरी एकमेकांवरील प्रेमच त्यांना एकमेकांसाठी अनुरूप बनवत असतं. बराच काळ एकमेकांबरोबर व्यतीत केल्यावर जसं त्या व्यक्तींमध्ये प्रेम निर्माण होतं, तसंच अॅरेंज मॅरेज केलेल्या जोडप्यांमध्येही. म्हणूनच तर कोणावर ठरवून प्रेम करायचं, म्हटलं तर ते शक्य आहे. शेअरिंग आणि केअरिंग यांच्या आधारावर हे प्रेम फुलवता येऊ शकतं, असं रॉबर्ट म्हणतो. म्हणूनच तर आपल्याकडे म्हटलं जातं, नवराबायको ही संसाररथाची दोन चाकं. दोन्ही चाकांशिवाय हा रथ पुढे हाकणार कसा?

Thursday, February 4, 2010

हमारी generation की आवाज सुनो !



स्वतःच्या हव्या तशा आयुष्याच्या मांडणीचा विचार करणारी, त्यासाठी पालकांची मदत घेणारी ही एक महाविद्यालयीन युवती... प्रातिनिधिक स्वरूपात ती पालकांना काहीतरी सांगू पाहतेय. आजच्या युवा पिढीचे भावविश्‍व शब्दबद्ध करण्याचा तिचा हा एक प्रयत्न स्वानुभवांसह, तिच्याच शब्दांत...!विद्यार्थ्यांमध्ये जेव्हा Society, Elders, Parents हे विषय निघतात, तेव्हा प्रत्येक जण त्यांच्या आई-वडिलांचा एक कॉमन व famous dialog सांगतात, "जास्त हुशारी करू नकोस. आम्ही तुझ्यापेक्षा जास्त उन्हाळे, पावसाळे बघितलेत!''पालकांना हे तरी माहीत आहे का की, त्यांच्या वेळचे उन्हाळे, पावसाळे व आताचे उन्हाळे, पावसाळे यामध्ये किती तफावत आहे? त्यांना सांगावंसं वाटतं, की तुमचा हा डायलॉग त्या काळासाठी योग्य असेल; पण आता उन्हाळे, पावसाळे तरी जागेवर राहिले आहेत का ? तुमचा उन्हाळा, पावसाळा व आमचा उन्हाळा, पावसाळा यात कम्पॅरिझन होऊच शकत नाही; कारण या दोन पिढ्यांमध्ये जो काळ आहे, त्यामध्ये झालेले changes उदाहरणार्थ © science, technology व Globalisation हे काळापेक्षाही जास्त speed ने पुढे गेले आहेत. त्यामुळे आमच्या पिढीचे विचार तुमच्याशी जुळू शकत नाहीत....म्हणे 'स्वंयपूर्ण' व्हा !मोबाईल व इंटरनेटवर नेहमीच त्यांचा राग असतो; पण आजची परिस्थिती अशी आहे, की एक वेळ जेवायला नसले तरी चालू शकते; पण या साऱ्या गोष्टी जीवनावश्‍यकच झाल्या आहेत. आम्ही मानतो, की काही जण त्याचा अतिरेक करतात, ऍडिक्‍ट होतात; पण जे त्याचा योग्य तऱ्हेने उपयोग करतात, त्यांच्यासाठी ते देवासारखे आहेत. खरं तर मोठ्यांनी आमच्याकडून या गोष्टी कशा वापरायच्या, हे शिकले तर बरे होईल. नेमकी कॉलेजला निघायची वेळ किंवा टीव्हीवर आपल्या आवडीचे काही बघत असतो, तेव्हा त्यांना दुसऱ्यांना sms करण्याची आठवण येते. स्वतःला sms करता येत नाही, याचा राग ते आमच्यावर काढतात. रूटीन कामे सांगावीत तसे, एवढा sms करून दे आणि तेही रुबाबात सांगतात. घराबाहेर गेल्यावर मोबाईलमध्ये काही अडचण निर्माण झाली, तर त्यांना दुसऱ्यांची मदत घ्यावी लागते. स्वतःचा अडाणीपणा ते दुसऱ्यासमोर दाखवतात. विशेष म्हणजे त्यांना काहीच वाटत नाही आणि आपल्याला मात्र म्हणतात, "काय थोड्या थोड्या गोष्टींमध्ये तुम्हाला मदत लागते. आता मोठे झालात. स्वयंपूर्ण व्हा! हे कितपत स्वयंपूर्ण आहेत ते त्यांनाच माहीत!'काही पालक मात्र फार मोठ्या मनाचे असतात. आपले अज्ञान जाणून घेऊन आपल्याच मुलांकडून ज्ञान update करतात. त्याबद्दल काही माध्यम वापरून सर्वांना जागे करतात. मागच्याच महिन्यात 'सकाळ'मध्ये संपादक उत्तम कांबळेंचा 'मोबाईल हरवला व मोबाईल सापडला' वाचले. आम्हा सर्वांना वाचून फार आनंद झाला. वाटलं असंच सर्व पालकांनी मुलांकडून काय शिकण्यासारखं आहे ते जगजाहीरपणे कबूल केलं, तर बाकी पालकांवर त्याचा निश्‍चितच परिणाम होऊ शकतो. आमची अशा फालतू कामांपासून सुटका होऊ शकते. लुडबूड नकोय आम्हाला...!होस्टेलवर राहणारे कसेबसे पालकांच्या तडाख्यातून सुटून दुसऱ्या गावात येतात, तेव्हाही "पालकजात' पिच्छा सोडत नाही. सतरांदा फोन करतील. "आज काय केलं बेटा?' हा तर आईचा नेहमीचा प्रश्‍न असतो. त्यामुळे त्यांना रोजचं रूटीन "त्यांना जसं आवडतं,' तसं सांगून मोकळं होतो आम्ही; कारण रात्री मित्रांशीही फोनवर गप्पा करायच्या असतात. दुसरीही काही कामे असतात त्याबद्दल यांना सांगितलं, तर आहे तिथून लुडबूड करायला कमी करत नाहीत.होस्टेलवर राहणाऱ्या मुलींचं तर विचारूच नका. ती जिथे जिथे जाते तिथे तिथे तिची आई फोनने पिच्छा करत असते. हेही कमी की काय, 'पेरेंट्‌स मीटिंग'च्या वेळी जर यांचे प्रश्‍न ऐकले की असं वाटतं, अरे, आम्हाला काय तुम्ही अजूनही school going students समजता का? आम्ही कॉलेजमध्ये आलो. मोठे झालो हे त्यांच्या डोक्‍यातच जात नाही. असे बाळबोध प्रश्‍न विचारतात, की त्यांच्या प्रश्‍नांची कीव करावीशी वाटते. 'सातच्या आत घरात' विसरा आता ! मला चांगलं आठवतं, आमच्या प्राचार्यांना एका पालकांनी प्रश्‍न केला, की सर, तुमच्या कॉलेजच्या होस्टेलवर रात्रीचे लहशलज्ञ ळप 10.30 ला आहे. म्हणजे तुम्ही रात्री 10.30 पर्यंत मुलींना भटकू देता. एवढेच नाही, तर काही मुली 10 वाजता बाहेर जातात व 10.30 ला होस्टेलवर येतात, हे योग्य आहे का? मला वाटतं अजूनही बरेचसे पालक "मुलींनी सातच्या आत घरात' या डायलॉगमधून बाहेरच निघालेले नाहीत. ते o situation चा विचार न करता प्राचार्यांसमोर मुलींवरचे प्रेम उतू घालतात. त्यांना हे कळत नाही Eng, Med. व इतर कॉलेजेस संध्याकाळी पाच ते सहापर्यंत असतात. त्यानंतर ती मुले कॉम्प्युटरचे क्‍लासेस किंवा अवघड विषयांच्या ट्यूशनला जातात. मग नऊ वाजेपर्यंत क्‍लास झाल्यावर जेवण करून रूमवर यायला 10.30 नक्कीच होणार. पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी येण्या-जाण्यामध्ये किती वेळ जातो, याचा ते विचारच करत नाहीत. मुले जर कॉलेजच्या मेसवर जेवत असतील, तर असा आव आणत प्राचार्यांना बोलतात, की तुमची जेवणाची क्वालिटी बेक्कार आहे. तुम्ही मेनूमध्ये असं ठेवायला पाहिजे, तसं ठेवायला पाहिजे. रोजच ही कुणाची तरी तक्रार असणार; कारण मेसमध्ये जेवणारी मुले सर्व states मधून आलेली असतात. त्यामुळे काहीही मेनू ठेवला तरी तो कोणाला न कोणाला आवडणार नाही आणि होस्टेलला यायच्या आधी जेवणाच्या बाबतीत यांनी आमच्यासाठी काय बोंब मारलेली असते न सांगितलेले बरे!'खोके बढाउंगा...उडाउंगा भी !'एका रविवारी आमचा ग्रुप picture नंतर मॅकडीमध्ये गेला. मनसोक्त गप्पागोष्टी रंगल्या होत्या. विषय काय असणार? सध्याचा गाजणारा म्हणजे विद्यार्थी आत्महत्या. एक जण म्हणाला, "काय यार हे काय आत्महत्येचं वारं आलंय. स्वाइन फ्लू एकाला झाला की दुसऱ्याला होतो माहीत होतं; पण सध्या तर, आज पाच आत्महत्या झाल्या, तर दुसऱ्या दिवशी त्याची संख्या 10 वर... सालं झालं तरी काय विद्यार्थ्यांना! असं वाटतं आपणही करून पाहावी की काय? पण ही करण्यासारखी गोष्ट असली तरी करून पाहण्यासाठी... अरे बापरे! या विचारानेच घाम फुटतो.''एक जण म्हणतो, "माझीही परिस्थिती अशीच आहे. सालं माझ्या जागेवर दुसरे कुणी असते, तर तो केव्हाच वर ट्रान्स्फर झाला असता. माझा बाप मोठ्ठा डॉक्‍टर त्यामुळे मी डॉक्‍टर झालोच पाहिजे, नाही तर त्यांची गादी कोण चालवणार? यार हे पेरेंट्‌स बापाने किराणा दुकान मुलाच्या ताब्यात द्यावे, अशाच प्रकारे गोष्टी करतात...''"मालूम है उसने मेरी ऍडमिशन के लिए आधा खोका दिया, लेकिन मेरे उपर के खोके में कुछ जाने को मांगता ना! तीन साल से गाडी आगेही नही जा रही, बोलता है चिंता मत कर! और आधा खोका लगाऊंगा। खुदको बहुत smart समझता है।''"अरे वो सब ठीक है लेकिन तू हमे एक बता। उपरका खोका तो हमारी समझ में आया, याने की तेरी खोपडी। लेकिन पहलेवाले ऍडमिशनवाले आधे खोके क्‍या है, हमारे भी खोपडी में डाल।''"अरे तुम सब बुद्दू हो...एक खोका याने एक करोड। करोड को ये बिझनेसवाले खोका कहते है।''"बापरे... आधा खोका याने की पच्चास लाख। तेरे बाप ने इधर भरा।''"अरे इस में कुछ बडी बात नही। उस के पास बहुत खोके पडे हुए है। और आप सबको तो पताही है, की मुझे ये डाक्‍टर लाइन बिलकूल पसंद नहीहै । मैं इंजिनिअर होना मांगता था लेकिन...'' "उसे मालूम नही जब मैं उनकी गद्दी पे बैठूंगा तो खोके बढाऊंगा लेकिन जीते-जागते खोके उडाउंगा।''म्हटलं, आम्हालाही पडतात प्रश्‍न !मी नाशिकची... आई-वडील शिक्षण क्षेत्रात असल्याने लहानपणापासून अकरावी-बारावीचे स्टुडंट्‌स बघते. पालक बघते. आता हे सर्व वरचं ऐकलं तेव्हा माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या एक डॉक्‍टर मॅडम. एकदा त्या आमच्याकडे आल्या. माझ्या पप्पांना म्हणाल्या, "सर, दोन महिन्यांवर परीक्षा आली आहे. माझी सोनाली बारावीत आहे. तिला जरा केमेस्ट्रीची मदत कराल काय?''दुसऱ्या दिवसापासून सोनाली संध्याकाळी सात ते रात्री नऊ आमच्याकडे. मॅडम स्वतः तिच्यासोबत यायच्या. खाली दोन तास गाडीत बसून राहायच्या. तिला सोबत घरी घेऊन जायच्या. प्रॅक्‍टिस सोडून दोन महिने दवाखाना बंद ठेवला. आईचं मुलीविषयीचं स्वप्न पूर्ण झालं. सोनाली मेडिकलला गेली. मोठा मुलगाही डॉक्‍टर झाला. त्यामुळे आई खूश; पण वडिलांना वाटायचं लहान्याने माझ्यासारखं डॉक्‍टर व्हावं. लहाना पठ्ठा फार हुशार निघाला! बारावीचा रिझल्ट लागेपर्यंत कळूच दिलं नाही, की त्याने अकरावीतच इळे. सोडलं आहे. रिझल्टनंतर आई-वडिलांना धक्काच. त्यानं ठरवलं होतं की डॉक्‍टर व्हायचं नाही. आई-वडील रिझल्टनंतर थोडा वेळ नाराज झाले. सर्व विसरून त्याच्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनच्या मागे लागले. चांगल्या ठिकाणी ऍडमिशन झाली. मागच्याच महिन्यात त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनला पुण्याला मम्मीबरोबर गेले तेव्हा कळलं, की मोठा मुलगा नाशिकमध्ये व सोनाली व छोटा मुलगा मोठ्या पोस्टवर फॉरेनमध्ये... भूतकाळात गेले... सोनालीला आईने त्या वेळी साथ दिली नसती तर... छोट्यावरचा राग लगेच विसरून पालक त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नसते तर... स्वतःची प्रॅक्‍टिस काही महिने बंद ठेवली नसती तर... हे असे अनेक प्रश्‍न...'असे आई-वडील आम्हालाही असते तर...? 'आधी दिलेल्या उदाहरणात त्या आई-वडिलांसारखं पैशाच्या जोरावर मुलाला डॉक्‍टर बनवणं व आपलं करिअर थोडं बाजूला ठेवून मुलांना मानसिकरीत्या सांभाळून प्रोत्साहन देणारे आई-वडील दोघांच्या ऍटिट्यूडमध्ये फार मोठी तफावत. पहिल्या उदाहरणात बनलेले डॉक्‍टर समाजाला घातक, तर दुसऱ्या उदाहरणात बनलेले डॉक्‍टर समाजाला आवश्‍यक.डॉ. उमेश कुलकर्णी व शर्मिला कुलकर्णी... पप्पांना मणक्‍यांचा त्रास म्हणून नेहमी त्यांच्याबरोबर भेट व्हायची... एकदा सहज विचारलं, ""डॉक्‍टरसाहेब, मॅडम दिसत नाहीत?''ते म्हणाले, ""आमच्या मुलीला खेळाची आवड. त्यामुळे ज्या वेळी बाहेरगावी तिच्या टूर्नामेंट्‌स असतात, तेव्हा आळीपाळीने आमच्यापैकी एक जण तिच्याबरोबर जातो...'' विश्‍वासच बसला नाही.12 जानेवारीला "सकाळ'चे संपादक उत्तम कांबळे यांनी "तुमच्याही मुलांच्या मनात आहे एक कविता,' हे शीर्षक असणारी न्यूज फ्रंट पेजवर छापली. सकाळी सहाला मम्मीचा मोबाईल वाजला. दुसरीकडून अनोळखी व्यक्ती माझ्या आईला congratulation देत होत्या. आईला व मला कळलं, की आमच्या कुटुंबावर फ्रंट पेजवर बातमी आहे. तीन ते चार दिवस मम्मीचा मोबाईल फुल एंगेज. एक कॉल सुरू असताना पाच-सहा कॉल्स वेटिंगवर... मला कळेना एवढे फोन कसे येताहेत? तेव्हा लक्षात आलं न्यूजमध्ये मम्मी-पप्पांचे मोबाईल नंबर दिले आहेत. न्यूज येईपर्यंत आम्हा कोणालाच वाटले नव्हते, की आम्ही काही वेगळं केलं आहे. परंतु जेव्हा एसएमएस वाचायला सुरवात केली, तेव्हा प्रत्येक मेसेजमध्ये मम्मी-पप्पांना
congratulation त्याचबरोबर माझ्यासाठी खूप सारे good wishes. मी मम्मीला विचारले, "हे काय?'तेव्हा मम्मी म्हणाली, "बेटा, मला जे फोन आले त्यामध्ये जे स्टुडंट होते त्याचं म्हणणं होतं, "मॅडम, आम्हालाही असे आई-वडील असते तर... किंवा मॅडम please माझ्या आईशी... माझ्या वडिलांशी बोलाल का?' अशा प्रकारच्या फोननी तर माझ्या आईची झोपच उडाली. लक्षात आलं, की कित्येक आई-वडील मुलांना समजून घेत नाहीत... नको तेवढी बंधनं टाकतात... आम्ही हे स्वप्न पूर्ण करू शकलो नाही, आता तू तरी पूर्ण कर... म्हणजे स्वतःचे स्वप्न मुलांकडून पूर्ण होण्याची अपेक्षा करतात... काही म्हणाले, "मॅडम, मला संगीताची आवड आहे, तर कुणाला ड्रॉइंगची, तर कुणाला खेळण्याची...' पण बहुतेक पालकांचं एकच म्हणणं, "पहिलं अभ्यासात लक्ष घाल. पूर्ण आयुष्य पडलं आहे छंद जोपासायला; पण माझ्या मम्मीला वाटतं शिक्षणाबरोबर जर छंद जोपासू दिले तर stress level कमी होऊ शकते; पण हे पालकांना पटविणे म्हणजे मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणे असे आहे. यामुळे माझ्या पेरेंट्‌सनी सर्वांच्या फोनला प्रतिसाद दिला. "तुमच्या मुलांच्या पाठीशी उभे राहा,' असे सांगितले. तुम्ही केलेल्या संस्कारांवर तरी ठेवा विश्‍वास !सध्या पेपर उघडला की हमखास विद्यार्थ्यांच्या आत्महत्येवर बातमी असते. विद्यार्थ्यांची stress level वाढली हे खरं आहे; पण त्यांना त्यांच्याच घरात समजून घेणाऱ्या प्रेमाच्या व्यक्ती लाभल्या तर...? ते frustration adiction च्या मागे लागतात. वाईट सवयी लावून घेतात व जिथे या गोष्टी म्हणजे stress level अतिशय वाढते, तेव्हा आयुष्याचा शेवट एवढाच पर्याय त्यांना दिसतो. नेहमी "फोनवर एवढा वेळ बोलते', असं मम्मीला म्हणणारी मी या घटनेनंतर तिचं बोलणं किती गरजेचं आहे हे माझ्या लक्षात आलं. अशा कित्येक आया आहेत त्या योग्य वेळी स्वतःच्या मुलांचं करिअर स्वतःच्या करिअरपेक्षा आवश्‍यक समजतात.
मला शाळेचे दिवस आठवतात. सातवी-आठवीमध्ये मुली आल्या, की पेरेंट्‌सला वेगळीच काळजी असते. नको तेवढ्या चौकशा... थोडासा उशीर झाला तरी शंभर प्रश्‍न, "आता तू मोठी झालीस. असं नको करू. तसं नको करू. असे कपडे घाल, तसे कपडे घाल, घरात कामाला मदत कर, मुलीची जात आहे. तुला स्वयंपाक यायलाच पाहिजे...' आणि रिस्ट्रिक्‍शन्स..माझ्या एका मैत्रिणीची आई मुलीवर सतत ऑर्डर सोडते. तिला एखादी गोष्ट करणे शक्‍य नसेल, तर कुठलाही प्रश्‍न विचारण्याचा तिला अधिकार नाही. आम्ही मैत्रिणीला एकदा विचारले, "का गं, आम्ही सर्व सायकलीवरून येतो, तू का नाही सायकलीवरून येत?' ती म्हणाली, "माझे आई-बाबा म्हणतात, सायकल चालवायची नाही; कारण त्याने उंची वाढते व उंची जर जास्त वाढली, तर तुझ्यासाठी मुलगा कुठून आणायचा?'शक्‍यतोवर आम्ही रात्री 10.30 ते 11.30 लॅपटॉपवर बसतो. इंटरनेटवर बसतो; कारण त्याच वेळी मित्र-मैत्रिणी भेटू शकतात. काही जण याचा गैरवापर करतात म्हणून प्रत्येकच जण गैरवापर करेल असे नाही. कधी कधी इनबॉक्‍स चेक करतात. त्यावरचे जे रिप्लाय असतात, त्याचा खरा मीनिंगच त्यांना माहीत नसतो किंवा तो कुठल्या मेसेजवर रिप्लाय आहे हेही माहीत नसतं. उगीचच निगेटिव्ह मीनिंग काढतात. आम्ही जास्त एसएमएस करतो; कारण ते आम्हाला स्वस्त वाटतात. उदाहरणार्थ मैत्रिणीला विचारायचं आहे "तू कुठं आहेस?' असे करण्यासाठी कॉलला एक रुपया; पण एसएमएसला एक पैसाच लागतो. त्यामुळे आम्ही एसएमएसचा भरपूर वापर करतो. तर यांना वाटतं काही तरी लफडंच आहे ! यांचा थोड्या थोड्या गोष्टींवर अविश्‍वास.शेवटी म्हणावं लागतं, ""अरे बाबा... तुम्हीच तर आमच्यावर संस्कार केले आहेत, त्यावरही तुमचा विश्‍वास नाही का?''बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती आहे, की आई-वडील मुलांशी नीट वागत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये गुड रिलेशनशिप तयार होत नाही. अशा वेळी मुलं आपलं मन मोकळं करू शकत नाहीत. जर त्यांचे मित्रही असे असतील, की त्यांच्याजवळ ते बोलू शकत नाहीत. त्या वेळी असं वाटतं, की भावना मोकळ्या करायला आई एवढं जवळ कोणीच असू शकत नाही. ज्यांना घरातच भावनिक संरक्षण मिळतं, ते वाईट मार्गाला लागत नाहीत....बाप म्हणून त्यांचा काय उपयोग? माझी मैत्रीण जी आदर स्टेटची आहे, ती एक दिवस चक्कर येऊन पडली. स्ट्रेसमुळे. दुसऱ्या स्टेटची असल्यामुळे आई-वडील लगेचच पोचू शकत नव्हते. माझ्या आईने तिला दवाखान्यात नेऊन दिवसभर भरती केले. रात्री घरी आणले.ती मैत्रीण डॉक्‍टरांना म्हणायची, "मुझे पप्पा से बात करनी है।' परंतु तिचे वडील ऑपरेशनमध्ये एंगेज असल्यामुळे बोलू शकत नव्हते. रात्री फोन केला त्यांना. सर्व घटना सांगितली. मी त्यांना विचारले, "अंकल, आप कब निकल रहे हो?' तेव्हा ते म्हणाले, "मुझे तीन-चार दिन मेजर ऑपरेशन्स है इसलिए नही आ सकता। ऐसा करो उसे बोलो दो दिन रेस्ट कर के प्लेन से चली आना।' मी तिच्या बाजूलाच बसले होते. माझं डोकं सुन्न झालं. तिच्या पप्पांना बाकी पेशंटसमोर स्वतःची मुलगी काहीच वाटत नसेल. कदाचित बाकी पेशंटचे ऑपरेशन दुसरे डॉक्‍टर करू शकतील; पण पप्पा म्हणून जर ते आले असते... नात्यातल्या दुसऱ्या कुणाला पाठवू शकले असते... असे डॉक्‍टर खोऱ्यांनी पैसे कमावतात; पण बाप म्हणून त्यांचा काय उपयोग? कदाचित पप्पांमुळेच ती परमनंट पेशंट बनेल.

अश्‍विनी जोगी, नाशिक

Tuesday, February 2, 2010

संपलेली माणुसकी
सौ. स्वाती संजय पोरवाल, बिबवेवाडी

त्या दिवशी रविवार होता. बऱ्याच दिवसांत हॉटेलात
जेवायला गेलो नव्हतो. माझी मुलगी म्हणाली, ""आज हॉटेलात जायचे.'' ती शक्‍यतो कधी बाहेर जेवायचे म्हणत नसल्याने माझ्या मिस्टरांनी लगेच होकार दिला. आम्ही तिघे एका प्रशस्त हॉटेलात गेलो. रविवार असल्याने बरीच गर्दी होती. बरेच लोक वेटिंगला होते. (कुठल्या प्रवासी तिकिटाला नव्हे हॉटेलमध्ये जेवायला) असो. कसेबसे आम्हाला एक टेबल मिळाले. आम्ही ऑर्डर दिली. जेवण येईपर्यंत सहजच इकडेतिकडे बघत होतो. समोरच्या टेबलावर 6-7 जणांचे कुटुंब बसले होते. सर्व हसतखेळत ताव मारत होते. त्याच बाजूला एक घोड्याटाइप खेळणे (गेम) होते. त्यावर एक वर्ष ते दीड वर्षांच्या लहान मुलाला घेऊन एक 10-12 वर्षांची मुलगी उभी होती. ते मूल छानपैकी घोड्यावर हलत होते, हसत होते. पण... त्या मुलीची नजर मात्र टेबलावर मांडलेल्या जेवणावर होती. तिच्या चेहऱ्यावरून तिला भूक लागल्याचे जाणवत होते. ती मुलाला घेऊन त्या कुटुंबाच्या टेबलाजवळ आली, तर ते मूल परत घोड्यावर जाण्यासाठी रडायला लागते. टेबलावरच्या एका स्त्रीने तिला हाताने तिकडे जाण्यास सुचवले. ती परत निराशेने वळली. आताही तिची नजर सर्व टेबलावर मांडलेल्या अन्नावर होती.आता आमचीही ऑर्डर आली होती. पण माझे काही जेवणात लक्ष लागेना. पती व मुलगी आनंदाने जेवत होते. माझ्या घशाखाली काही केल्या घास उतरेना. हे म्हणाले, "काय झाले? सारखे समोर काय पाहते आहे?'' मी त्यांना ती मुलगी व ते कुटुंब दाखवले. ते म्हणाले, ""जाऊ दे. त्याचं झाल्यावर तिला जेवायला देतील.'' पण माझे काही लक्ष लागेना. एव्हाना त्यांची जेवणं आटोपली होती व कुटुंबप्रमुखाने खुणेनेच वेटरला बिल देण्याची सूचना केली. मला कळून चुकले की त्या मुलीला इथे तरी जेवण मिळणे नाही. मला माहीत होतं, की जरी माझ्या मिस्टरांच्या मनात त्या मुलीला खायला घालायचे असले तरी ते भांडण नको म्हणून घालणार नाहीत. ते हात धुवायला गेले. एवढ्यात मी वेटरला पाहिले. त्याला बोलावले व त्या मुलीला पाव-भाजी व बरोबर दोन जोडी जास्त देण्यास सांगितले. वेटरजवळ 50 रु. दिले. तोपर्यंत ते लोक निघण्याच्या तयारीत होते. मी त्याच्या टेबलाजवळ जाऊन त्या स्त्रीला म्हणाले, ""माझा आज संकल्प होता, एखाद्या 10-12 वर्षांच्या मुलीला जेवायला घालायचे, पण दिवसभरात कोणीही भेटले नाही म्हणून तुमच्या कामवाल्या मुलीसाठी पावभाजी ऑर्डर केली आहे, ती खाईपर्यंत थांबा.'' त्या बाईने एकंदर प्रकार लक्षात घेता माझ्यावर जळजळीत कटाक्ष टाकला. मी तिच्याकडे न बघता त्या मुलीला खुणेने बोलावून तिला बसायला सांगितले व वेटरला परत ती मुलगी दाखवून लवकर आणण्यास सांगितले. तेवढ्यात माझे पती आले, मी काढतापाय घेतला. नंतर काय झाले माहीत नाही. बाहेर आल्यावर जेव्हा मी त्यांना ही गोष्ट सांगितली तेव्हा ते म्हणाले, ""पावभाजी का? तिला एक भाजी व 2-3 पराठे द्यायचे होतेस ना? ती तरी हे कधी खाणार? मी पैसे दिले असते.''दुसरा प्रसंग माझ्या मैत्रिणीच्या घरी तिच्या मुलाची बर्थडे पार्टी होती. मुले एन्जॉय करत होती. इडली, सांबार, बर्फी, केक, चॉकलेट, पलीकडे एक डिश धुण्यासाठी बाई बसली होती. तिच्याबरोबर एक 5-6 वर्षांचा मुलगा होता. तो केविलवाण्या नजरेने हे सर्व पाहत होता. मी मैत्रिणीला म्हणाले, ""त्याला खायला दे ना.'' ती म्हणाली, ""अगं सगळं झाल्यावर देईन. नाही तरी मुलं खूप उष्टं टाकतात.'' हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. आपल्या मुलाचं आपण किती कौतुक करतो. पाहिजे ती वस्तू त्याला आणून देतो. मग आपल्याकडे काम करणाऱ्या लहान बछड्यांचे असे हाल? मोठं माणूस असेल तर आपले मन मारू शकते, पण लहान मुलांना थोडी कळतं की आपण नोकर आहोत. आपल्याला असलं काही मिळणार नाही. मला वाटलं होतं एक डिश घ्यावी व त्या मुलाला द्यावी, पण मैत्रिणीचा स्वभाव पाहता हिंमत झाली नाही. आता वाटतं माझी डिश मी त्याला देऊन त्या मैत्रिणीलाही झाडायला हवं होतं, उष्टं देणं किती पाप. गरिबी हा त्यांचा गुन्हा आहे का? देवानेही अशा लोकांना जन्माची अद्दल घडवायला हवी.सर्व नोकर ठेवणाऱ्या लोकांना माझी कळकळीची विनंती, की कमीत कमी लहान मुलाचे मन मारू नका. आपल्या मुलासारखं त्यांना वागवा, मग बघा त्याच्या आयाही किती प्रामाणिकपणे काम करतील आणि तुमचे मनाचे समाधान? ते तर तुम्ही कशातही मोजू शकणार नाही, माणुसकीचा अंत करू नका.